चेन्नई : आयपीएलच्या 17 (IPL 2024) व्या पर्वातील सातवी मॅच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात पार पडली. या मॅचमध्ये चेन्नईनं गुजरातला 63 धावांनी पराभूत केलं. गुजरातनं टॉस जिंकून प्रथम चेन्नईला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. चेन्नईनं या संधीचा फायदा घेत 20 ओव्हर्समध्ये 6  विकेटवर 206 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 20 ओव्हर्समध्ये 8 विकेटवर 148 धावा करु शकला. चेन्नईनं बॅटिंग, फिल्डींग आणि बॉलिंग यामध्ये चांगली कामगिरी करत विजय मिळवला.चेन्नईकडून राजीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे यांनी चांगल्या धावा काढल्या.  फलंदाजीमुळं हे खेळाडू चर्चेत राहिले. मात्र, यांच्यासोबत आणखी एक खेळाडू चर्चेत आला. उत्तर प्रदेशचा सिक्सर किंग समीर रिझवी (Sameer Rizvi) असं त्याचं नाव आहे. 


सिक्सर किंगनं झलक दाखवली


सिक्सर किंग समीर रिझवीनं त्याच्या फलंदाजीची झलक गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये दाखवली. समीर रिझवीला 22 मार्च रोजी आरसीबी विरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईनं संघात स्थान दिलं होतं. मात्र, चेन्नईकडून पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळाली नव्हती. गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये समीर रिझवीला बॅटिंग करण्याची संधी मिळाली. राशिद खानच्या ओव्हरमध्ये समीर रिझवीनं दोन सिक्स मारले. 






चेन्नईच्या टीमनं समीर रिझवीला 8.4 कोटी रुपये मोजून संघात सामील करुन घेतलं होतं.गुजरात टायटन्सच्या बॉलर राशिद खाननं 19 व्या ओव्हरमध्ये शिवम दुबेला 51 धांवावर बाद केलं होतं. त्यानंतर समीर रिझवी फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. राशिद खान सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नावाजलेला स्पिनर बॉलर आहे. राशिद खानचा सामना करणाऱ्या समीर रिझवीनं पहिल्याच बॉलवर सिक्स मारला. 


समीर रिझवीनं गुडघ्यावर बसून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक सिक्स मारला. समीर रिझवीनं राशिद खानला दोन सिक्स मारले. चेन्नईच्या 20 व्या ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात समीर रिझवी बाद झाला. 


समीर रिझवीनं आयपीएलमध्ये पहिल्या डावात पहिल्याच बॉलवर सिक्स मारणाऱ्या क्रिकेटर्सच्या यादीत एंट्री केली आहे.या यादीत रॉब क्विनी, केवॉन कुपर, आंद्रे रसेल, कार्लोस ब्राथवेट,अनिकेत चौधरी, जवोन सेअरलेस, सिद्धेश लाड, महेश तिक्षाणा, समीर रिझवी यांचा त्यात समावेश आहे. 


समीर रिझवी हा उत्तर प्रदेशातील अलीगड आणि मेरठशी संबंधित आहे. समीर रिझवीनं यूपी लिगमध्ये 400 हून अधिक धावा केल्या होत्या. यामध्ये त्यानं 35 सिक्स मारले होते. यामुळं त्याचं नाव सिक्सर किंग असं पडलं होतं. सी.के. नायडू ट्रॉफीतही त्यानं सिक्स मारले होते. 


संबंधित बातम्या : 


Ajinkya Rahane: अजिंक्यनं हनुमान उडी मारत घेतला अफलातून कॅच, गुजरातच्या डेव्हिड मिलरचा कार्यक्रम,पाहा व्हिडीओ


Vintage Dhoni : असा झेल होणे नाही, धोनीनं हवेत सूर मारत घेतला अविश्वसनीय झेल!