Mumbai Indians Rohit sharma : मुंबई इंडियन्स संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, त्यामागील कारण रोहित शर्माचं (Rohit Sharma) कर्णधारपद आहे. आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians) खांदेपालट करण्यात आली.  रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेत हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपवण्यात आले.  हा निर्णय चाहत्यांना रुचला नाही, चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. याबाबत संघाचे कोच मार्क बाऊचर यांनी स्पष्टीकरण दिलं. पण त्यातून नवा वाद उफाळला आहे. कारण बाऊचर याचं म्हणणं न पटल्यानं रोहितच्या पत्नीने तिखट प्रतिक्रिया दिली. बाऊचर यांनी मांडलेल्या अनेक गोष्टी चुकीच्या आहेत, असे स्पष्टपणे रितिका हिने सांगितलेय. रितिकाच्या वक्तव्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सगळं काही ठिक नसल्याचं दिसतेय. 


मार्क बाऊचर काय म्हणाला ?


क्रिकेटच्या अखेरच्या टप्प्यात रोहित शर्माने मोकळेपणे खेळावे. तो भारताचे नेतृत्व करतोय. अशा स्थितीत आयपीएलमध्ये खेळताना त्याच्यावरील कर्णधारपदाचे दडपण कदाचीत कमी होईल. त्यामुळे त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होताना दिसेल, असे मुंबई इंडियन्सचा मुख्य कोच मार्क बाऊचर याने मुलाखतीत सांगितलं. 


स्मॅश स्पोर्ट्स पॉडकास्टवर बोलताना मार्क बाउचर म्हणाला की, मागील काही हंगामापासून रोहित शर्मा फलंदाज म्हणून फ्लॉप जातोय. त्यामुळे आम्ही खूप विचार करुन हार्दिक पांड्याला कर्णधार केलेय. त्याने मनमोकळेपणाने खेळावे. करिअरच्या अखेरच्या टप्प्यात रोहित शर्मावरील दडपण कमी व्हावे, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.


हार्दिक पांड्याकडे शानदार नेतृत्वाचं स्किल्स - 


मार्क बाऊचर याने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचेही कौतुक केलेय. हार्दिक पांड्या मुंबईचाच आहे. तो दुसऱ्या संघात गेला, तिकडे त्याने पहिल्याच हंगामात चषकाला गवसणी घातली. दुसऱ्या वर्षी उपविजेता राहिला. हार्दिक पांड्याचं नेतृत्व शानदार आहे.


दरम्यान, आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला ट्रेंड विंडोद्वारे गुजरातच्या ताफ्यातून घेतले. हार्दिक पांड्याने गुजरातला पदार्पणातच चषक जिंकून दिला. त्यानंतर दुसऱ्या हंगामात उपविजेतेपद मिळवून दिले. आयपीएल 2024 आधी मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढत हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवलं. यावरुन सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये नाराजी होती. 






 हार्दिक पांड्याचं आयपीएल करियर - 


हार्दिक पांड्याने मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पण त्यानंतर तो गुजरातच्या ताफ्यात गेला. गुजरातला त्याने पदार्पणातच चषक जिंकून दिला. त्याशिवाय गतवेळच्या आयपीएल स्पर्धेत उपविजेता ठरला होता. मुंबईसाठी हार्दिक पांड्या सहा वर्ष खेळलाय. त्यानंतर त्याने गुजरातची वाट धरली होती. आता तो मुंबईच्या ताफ्यात परतलाय. त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा संभाळली. 


रोहितचं आयपीएल करियर -


रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच आयपीएल चषकावर नाव कोरलेय. 2013 पासून रोहित शर्माने मुंबईची धुरा संभाळली होती.  2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने चषकावर नाव कोरले होते. रोहित शर्माची आयपीएलमधील कामगिरीही शानदार राहिली आहे. रोहितने 243 सामन्यात 6211 धावा चोपल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.