Mark Boucher on Rohit Sharma : आयपीएल 2024 चा हंगाम लवकरच सुरु होतोय. प्रत्येक संघाने तयारी सुरु केली आहे. चाहतेही उत्साहात आहेत. आयपीएलच्या मिनी लिलावाआधीच मुंबई इंडियन्सनं धमाका करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून हार्दिक पांड्याकडे धुरा सोपवली. पाच वेळच्या चॅम्पियन रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर चाहत्यांमध्ये संताप पाहायला मिळाला. पण रोहित शर्माची कॅप्टन्सी का काढली? याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. मुंबईला सोशल मीडियावर ट्रोल केले, फॉलोअर्सही घटले. पण हार्दिक पांड्याला कर्णधार का केले ? याबाबत हेड कोच मार्क बाऊचर यांनी उत्तर दिलेय. 


रोहित शर्माला कर्णधारपदावरुन का काढलं ?


 स्मॅश स्पोर्ट्स पॉडकास्टवर बोलताना मार्क बाउचर म्हणाला की," माझ्या मते हा क्रिकेटिंग निर्णय आहे. हार्दिक पांड्याला खेळाडू म्हणून आम्ही ट्रेडिंग विंडोचा वापर केला. मुंबईसाठी हा बदलाचा काळ आहे. जास्तीत जास्त भारतीय चाहते भावूक असल्यामुळे त्यांना ही गोष्ट समजली नाही. पण भावना बाजूला ठेवाव्या लागतात. हा फक्त क्रिकेटसाठी घेतलाला निर्णय आहे. या निर्णायामुळे रोहितचा बेस्ट येईल. रोहित शर्मा फलंदाजीचा पूर्ण आनंद घेईल, त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल."


हार्दिक पांड्याकडे शानदार नेतृत्वाचं स्किल्स - 


मार्क बाऊचर याने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचेही कौतुक केलेय. हार्दिक पांड्या मुंबईचाच आहे. तो दुसऱ्या संघात गेला, तिकडे त्याने पहिल्याच हंगामात चषकाला गवसणी घातली. दुसऱ्या वर्षी उपविजेता राहिला. हार्दिक पांड्याचं नेतृत्व शानदार आहे. 






 हार्दिक पांड्याचं आयपीएल करियर - 


हार्दिक पांड्याने मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पण त्यानंतर तो गुजरातच्या ताफ्यात गेला. गुजरातला त्याने पदार्पणातच चषक जिंकून दिला. त्याशिवाय गतवेळच्या आयपीएल स्पर्धेत उपविजेता ठरला होता. मुंबईसाठी हार्दिक पांड्या सहा वर्ष खेळलाय. त्यानंतर त्याने गुजरातची वाट धरली होती. आता तो मुंबईच्या ताफ्यात परतलाय. त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा संभाळली. 


रोहितचं आयपीएल करियर -


रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच आयपीएल चषकावर नाव कोरलेय. 2013 पासून रोहित शर्माने मुंबईची धुरा संभाळली होती.  2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने चषकावर नाव कोरले होते. रोहित शर्माची आयपीएलमधील कामगिरीही शानदार राहिली आहे. रोहितने 243 सामन्यात 6211 धावा चोपल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.