IPL 2023 Wardha Latest News Update : देशभरात सध्या आयपीएलचा फिवर सुरु आहे. प्रत्येक क्रीडाप्रेमी आयपीएलचे सामने पाहत आहे. रंगतदार सामन्याचा उत्साह क्रीडाप्रेमींमध्ये आहे. आयपीएलवर काही ठिकाणी सट्टा लावला जात असल्याचे समोर आले आहे. वर्ध्यामध्ये आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. तब्बल 40 मोबाईल आणि तीन लॅपटॉपच्या माध्यमातून वर्ध्यात आयपीएल सामन्यावर जुगार खेळला जात होता. स्थानिक पोलिसांनी आज कारवाई केली. जवळपास पन्नास लाख रुपयांच्या मुद्देमालासह दोन महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. दिल्ली आणि मुंबई या सामन्यावर सट्टा लावला जात होता. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली.


वर्ध्यात आयपीएल सान्यावर जुगार खेळणाऱ्यावर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. वर्धा पोलीस प्रशासनाच्या क्राईम इंटेलिजन्स पथक आणि सायबर क्राईमने धडक कारवाई केली. वर्ध्याच्या भामटी पुरा येथील गणेश राठी याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी राठी याचा मोबाईल जप्त करून मोबाईलमधील माहितीवरून नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट येथे या जुगाराचा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली. पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी कारवाईसाठी टीम तयार केली. वर्धा पोलिसांनी टाकळघाट येथील लिंक बिल्डिंग येथे धाड टाकली, या धाडीत आयपीएलचा जुगार मोबाईलच्या साहाय्याने खेळला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्धा येथे असलेला मोबाईलचा साठा आणि तीन लॅपटॉप यातून लाखोंचा जुगार लावला जात होता. येथून सलमान रज्जक मेमन, जितेंद्र रंजित तिवारी, माधव ईश्वरदास नाणवाणी, मुकेश अनिल मिश्रा, रिंकेश मनोज तिवारी या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली विरुद्ध मुंबई या क्रिकेट सामन्यावर प्रत्येक बॉलवर सट्टा लावला जात होता. पोलिसांनी या करवाईमध्ये दोन महागड्या कार, चाळीस मोबाईल, तीन लॅपटॉप असा एकूण 49 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



मुंबई इंडियन्सकडून दिल्लीचा धुव्वा 


अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केली. तर तिलक वर्मा याने झटपट 41 धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी पाच धावांची गरज होती. पण एनरिख नॉर्जे याने यॉर्कर गोलंदाजी करत टिम डेविड आणि कॅमरुन ग्रीन यांना धावा काढून दिल्या नाहीत. अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील मुंबईचा पहिला विजय आहे. तर दिल्लीचा सलग चौथा पराभव झाला. रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी केली. पहिल्या चेंडूपासून रोहित शर्मा याने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहित शर्माने 45 चेंडूत 65 धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्मा याने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. रोहित शर्मा याने सुरुवातीला ईशान किशन याच्यासोबत 71 धावांची भागीदारी केली. त्यानंतर तिलक वर्मा याच्यासोबतही अर्धशतकी खेळी केली.