IPL 2023 Auction : उत्तर प्रदेश रणजी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आणि लखनौमधील रेल्वे क्लर्क उपेंद्र यादव (Upendra Yadav) याचं स्वप्न अखेर पूर्ण होत असून यंदाच्या आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत तो पदार्पण करताना दिसणार आहे. आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये (IPL 2023 Auction) उपेंद्र यादवचंही नाव होतं. यावेळी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने त्याला 25 लाख रुपये देऊन आपल्या संघाचा भाग बनवलं. मुंबईने त्याच्यावर 20 लाखांची बोली लावली होती, परंतु सनरायझर्सने बोली वाढवून त्याला आपल्या संघाचा भाग बनवलं. त्यामुळे यंदातरी उपेंद्र याचे आयपीएलमध्ये पदार्पण करण्याचे स्वप्न निश्चित झाले आहे.


रणजीमध्ये 2020 मध्ये ठोकलं दुहेरी शतक


उपेंद्र यादव हा मूळचा कानपूरचा आहे, त्याने 2020 रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळताना मुंबई विरुद्ध गट-बी सामन्यात द्विशतक ठोकलं होतं. मिनी लिलावात त्याच्या द्विशतकाने निवडकर्त्यांना प्रभावित केले. त्याच्या द्विशतकापूर्वी त्याने 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 41 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 70 धावांची धडाकेबाज खेळीही खेळली होती. ज्यामुळे अखेर उपेंद्रला विकत घेण्यात संघीनी इंटरेस्ट दाखवला आहे.


सनरायझर्स हैदराबादमध्ये सहभागी झाल्याने आनंदी : उपेंद्र


 आयपीएल निवडीबद्दल टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना उपेंद्र म्हणाला, “सामन्यानंतर आम्ही एक टीम मीटिंग करत होतो, तेव्हा माझ्या एका टीममेटने मला माझ्या आयपीएल निवडीबद्दल सांगितले. सनरायझर्स हैदराबादमध्ये सहभागी होताना मला आनंद होत आहे. आपल्या यशाचं श्रेय उपेंद्रने मोठा भाऊ वरुण यादवला दिलं तो म्हणाला, “माझ्या भावाने माझ्यासाठी स्वत: क्रिकेटर होण्याचे स्वप्न सोडले. सकाळी 6 ते संध्याकाळपर्यंत तो माझ्यासोबत होता - मला माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन आणि काळजी त्यानेच घेतली.” कानपूरच्या उपेंद्र यादवने 2016 मध्ये सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशकडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पुढच्याच वर्षी ते रेल्वेतही रुजू झाला आहे.


'या' अनकॅप्ड खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस


यंदाच्या लिलावात चांगली किंमत मिळालेल्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर शिवम मावी सर्वात महाग विकला गेला. शिवम मावीला गुजरात टायटन्सने 6 कोटी रुपयांना विकत घेतले.  शिवम मावीनंतर मुकेश कुमार हा दुसरा सर्वात महागडा अनकॅप्ड भारतीय खेळाडू होता. दिल्ली कॅपिटल्सने मुकेश कुमारला 5.50 कोटी रुपयांना खरेदी केले. या यादीत बऱ्याच अनकॅप्ड खेळाडूंना चांगली किंमत मिळाली. 


सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू


शिवम मावी - 6 कोटी रुपये (गुजरात टायटन्स)
मुकेश कुमार - 5.50 कोटी रुपये (दिल्ली कॅपिटल्स)
विव्रांत शर्मा - 2.60 कोटी रुपये (सनरयझर्स हैदराबाद)
केएस भारत - 1.20 कोटी रुपये (गुजरात टायटन्स)
एन जगदीशन - 90 लाख रुपये (कोलकाता नाईट रायडर्स)


हे देखील वाचा-