Who is Harry Brook : हॅरी ब्रूक याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने निर्धारित 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 228 धावांचा डोंगर उभारला. यंदाच्या हंगामातील ही सर्वाधिक धावसंख्या होय. हॅरी ब्रूक याने विस्फोटक फलंदाजी करत 55 चेंडूत शतक झळकावले. हॅरी ब्रूक याने यंदाच्या हंगामातील पहिलेवहिले शतक झळकावले. हैदराबादने इंग्लंडच्या हॅरी ब्रूकसाठी कोट्यवधी रुपये मोजले होते. हा हॅरी ब्रूक आहे तरी कोण? त्याची कामगिरी कशी आहे? जाणून घेऊयात
13.25 कोटी रुपायंची बोली -
आयपीएलच्या सोळाव्या हंगामापूर्वी झालेल्या लिलावात हैदराबादने हॅरी ब्रूक याला 13.25 कोटी रुपये खर्च करुन आपल्या ताफ्यात घेतले होते. पण सुरुवातीच्या सामन्यात हॅरी ब्रूक याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. यावरुन त्याच्यावर आणि हैदराबाद संघावर टीका केली जात होती. पण आज अखेर हॅरी ब्रूक याने वादळी खेळी करत सर्वांनाच प्रभावित केले.
कोण आहे हॅरी ब्रूक ?
हॅरी ब्रूक इंग्लंड संघातील विस्फोटक फलंदाज आहे. कसोटी सामन्यात वादळी खेळी केल्यामुळे हॅरी ब्रूक सर्वात आधी चर्चेत आला होता. हॅरी ब्रूक याने कसोटीत टी20 प्रमाणे फलंदाजी करत सर्वांचेच लक्ष वेधले होते. हॅरी ब्रूक याचा जन्म 22 फेब्रुवारी 1999 रोजी यॉर्कशरमध्ये झाला होता. त्याने इंग्लंड संघाच्या अंडर 19 संघाचे नेतृत्व केलेय. 2020 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या टी 20 ब्लास्ट स्पर्धेत त्याने कमालीचे प्रदर्शन केले होते. मध्यक्रममध्ये फलंदाजी करतानाही त्याने 55 च्या सरासरीने आणि 163 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. त्यानंतर 2021 मध्येही त्याने विस्फोटक अंदाजात फलंदाजी केली. 26 जानेवारी 2022 रोजी त्याने वेस्ट इंडिजविरोधात टी 20 मध्ये पदार्पण केले होते. तर 8 सप्टेंबर 2022 रोजी दक्षिण आफ्रिकाविरोधात त्याने कसोटीत पदार्पण केले. हॅरी ब्रूक याने सहा कसोटीत 10 डावात 809 धावांचा पाऊस पाडलाय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने तीन डावात 80 धावा केल्या आहेत. तर 20 टी20 सामन्यात त्याने 372 धावांचा पाऊस पाडलाय.
पाकिस्तानविरोधातील खेळीनंतर चर्चेत -
2022 मध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका झाली. या तीन सामन्यात हॅरी ब्रूक याने 468 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये तीन शतके आणि एक अर्धशतकाचा समावेश होता. प्लेअर ऑफ द सिरिज पुरस्काराने त्याला सन्मानितही करण्यात आले. पाकिस्तानविरोधात कसोटीत वादळी फलंदाजी केल्यानंतर हॅरी ब्रूक याची जगभरात चर्चा झाली होती.
हॅरी ब्रूकचे वादळी शतक
हॅरी ब्रूक याने कोलकात्याविरोधात सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याने चारी बाजूने धावांचा पाऊस पाडला. हॅरी ब्रूक याने 55 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीत ब्रूक याने तीन षटकार आणि 12 चौकार लगावले. हॅरी ब्रूक याने पावरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडला.. त्यानंतर त्याने संयमी फलंदाजी करत धावसंख्या हालती ठेवली. हॅरी ब्रूक याने माक्ररमसोबत तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अभिषेक शर्मासोबत चौथ्याविकेटसाठी 33 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. तर पावरप्लेमध्ये मयंक अग्रवालसोबत हॅरी ब्रूक याने 46 धावांची भागिदारी केली. अखेरीस कालसेनसोबत त्याने 11 चेंडूत 27 धावांची भागिदारी केली.