IPL 2023, KKR vs SRH: हॅरी ब्रूक याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 228 धावांचा डोंगर उभारला. यंदाच्या हंगामातील ही सर्वाधिक धावसंख्या होय. हॅरी ब्रूक याने विस्फोटक फलंदाजी करत 55 चेंडूत शतक झळकावले. हॅरी ब्रूक याने यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले. हैदराबादने कोलकात्याला विजयासाठी 229 धावांचे आव्हान दिलेय. 


हॅरी ब्रूकचे शतक 


हॅरी ब्रूक याने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याने चारी बाजूने धावांचा पाऊस पाडला. हॅरी ब्रूक याने 55 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीत ब्रूक याने तीन षटकार आणि 12 चौकार लगावले. हॅरी ब्रूक याने पावरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडला.. त्यानंतर त्याने संयमी फलंदाजी करत धावसंख्या हालती ठेवली. हॅरी ब्रूक याने माक्ररमसोबत तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अभिषेक शर्मासोबत चौथ्याविकेटसाठी 33 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. तर पावरप्लेमध्ये मयंक अग्रवालसोबत हॅरी ब्रूक याने 46 धावांची भागिदारी केली. अखेरीस कालसेनसोबत त्याने 11 चेंडूत 27 धावांची भागिदारी केली. 


एडन माक्ररमची कर्णधाराला साजेशी खेळी - 


हैदराबादचा कर्णधार एडन माक्ररम याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने 26 चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. माक्ररम याने या खेळीत पाच षटकार आणि दोन चौकार लगावले. माक्ररम याने विस्फोटक फलंदाजी करत हैदाराबादच्या डावाला आकार दिला. आघाडीच्या दोन विकेट झटपट गेल्यानंतर माक्ररम याने हॅरी ब्रूकच्या साथीने हैदराबादचा डाव सावरला.  हॅरी ब्रूक आणि माक्ररम यांनी तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. यामध्ये माक्रमरचा वाटा 50 धावांचा होता. तर हॅरी ब्रूक फक्त 20 धावांचे योगदान दिले. 


अग्रवाल-त्रिपाठी फ्लॉप - 
मयंक अग्रवाल याला अद्याप सूर गवसलेला दिसत नाही. आजही मयंक अग्रवाल स्वस्ता बाद झाला. मयंक अग्रवाल याला फक्त 9 धावा काढता आल्या. यासाठी त्याने 13 चेंडू घेतले. मयंक आणि हॅरी ब्रूक यांनी पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागिदारी केली. पण यामध्ये हॅरी ब्रूक याचे मोठे योगदान होते. राहुल त्रिपाठीलाही आज मोठी खेळी करता आली नाही. त्रिपाठी फक्त 9 धावांवर बाद झाला. 


अभिषेक शर्माचे वादळ  -
एडन माक्ररम बाद झाल्यानंतर अभिषेख शर्मा याने वादळी फलंदाजी केली. अभिषेक शर्मा याने 17 चेंडूत 32 धावांची खेळी केली. या खेळीत अभिषेक शर्मा याने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. अभिषेक शर्मा याने हॅरी ब्रूक याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 33 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. अभिषेक शर्मा याने झटपट धावा काढल्यामुळे हैदराबादने 200 धावांचा पल्ला ओलांडला.


रसेलचा भेदक मारा - 
अष्टपैलू आंद्रे रसेल याने हैदराबादविरोधात भेदक मारा केला. त्याने हैदराबादच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. रसेल याने 2.1 षटकात 22 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. पण तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आंद्रे रसेल दुखापतग्रस्त झाला. रसेल याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे रसेल याला मैदान सोडावे लागले.


आंद्रे रसेल याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला अचूक टप्प्यावर मारा करता आला नाही. उमेश यादव याने तीन षटकात 42 धावा खर्च केल्या. लॉकी फर्गुसन याने दोन षटकात 37 धावा दिल्या. नारायण याने चार षटकात 28 धावा दिल्या.. पण विकेट एकही घेता आली नाही.  वरुण चक्रवर्ती याने चार षटकात 41 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. सुयेश शर्मा याने चार षटकात 44 धावा खर्च केल्या.