IPL 2023, SRH vs RCB: विराट कोहलीचे वादळी शतक आणि फाफचे संयमी अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने हैदराबादचा पराभव केला. हैदराबादने दिलेले 187 धावांचे आव्हान आरसीबीने दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. या विजयासह आरसीबीने 14 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. आरसीबीचा हा सातवा विजय आहे.  आरसीबीचा उर्वरित सामना गुजरातविरोधात बेंगलोरमध्ये होणार आहे.  हैदराबादचा 13 सामन्यात नववा पराभव झालाय. हैदराबादकडून हेनरिक क्लासेन याने वादळी शतक झळकावले होते.. पण विराट कोहलीच्या शतकापुढे हे शतक फिके पडले. 


विराट कोहलीचे वादळी शतक -


आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने हैदराबादविरोधात झंझावाती फलंदाजी केली. पहिल्या चेंडूपासून विराट कोहलीने तुफानी फटकेबाजी केली. विराट कोहलीने हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. विराट कोहलीने 63 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने चार षटकार आणि 12 चौकार लगावले. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी 172 धावांची भागिदारी केली. विराट कोहलीने यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले. पहिल्या डावात हैदराबादकडून हेनरिक क्लासेन याने शतकी खेळी केली होती. एकाच सामन्यात दोन संघांनी शतक झळकावण्याची दुर्मिळ गोष्ट घडली. विराट कोहली याच्या बॅटमधून यंदा धावाचा पाऊस पडला. विराट कोहलीचे आयपीएलमधील सहावे शतक होय.. विराट कोहली याने त्याचा जुना सहकारी ख्रिस गेल याची बरोबरी केली आहे. ख्रिस गेल याच्या सहा शतकाची बरोबरी विराट कोहलीने केली आहे. विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या नावावर आता सर्वाधिक शतकांची नोंद आहे. 


फाफची दमदार साथ - 


कर्णधार फाफ डु प्लेसिस याने विराट कोहलीला चांगली साथ दिली. विराट कोहली वादळी फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूला फाफ संयमी फलंदाजी करत होता. फाफने 47 चेंडूत 71 धावांची खेळी केली. या खेळीत फाफ याने दोन षटकार आणि सात चौकार लगावले. फाफ याने कर्णधाराला साजेशी खेळी करत आरसीबीच्या डावाला आकार दिला. फाफ आणि विराट यांनी 172 धावांची भागिदारी केली. आयपीएलमध्ये सलामीसाठी सर्वाधिक धावांचा विक्रम विराट-फाफ या जोडीवर आहे. दोघांनी एकाच हंगामात 900 पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली. विराट आणि फाफ बाद झाल्यानंतर उर्वरित काम मॅक्सवेल आणि मायकल ब्रेसवेल यांनी पूर्ण केले. 


हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, यांनी महागडी गोलंदाजी केली.