PBKS vs MI, Match Highlights: सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर मुंबईने पंजाबचा सहा विकेटने पराभव केला. पंजाबने दिलेले 215 धावांचे आव्हान मुंबईने सहा विकेटच्या मोबदल्यात सहज पार केला. पंजाबचा पराभव करत मुंबईने हिशोब चुकता केला. वानखेडेवर पंजाबने मुंबईचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा मुंबईने आज काढला. ईशान किशन याने 75 तर सूर्यकुमार यादव याने 66 धावांची निर्णायक खेळी केली. 


ईशान किशन-सूर्यकुमारने केली पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई 


सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी पंजाबच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार आणि ईशान किशन यांनी 55 चेंडूत 116 धावांचा पाऊस पाडला. पंजाबच्या प्रत्येक गोलंदाजांचा यांनी समाचार घेतला. दोघांनीही केलेल्या विस्फोटक फलंदाजीमुळे मुंबईने धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. ईशान किशन याने 41 चेंडूत 75 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने चार षटकार आणि सात चौकार लगावले. ईशान किशन याने कॅमरुन ग्रीन याच्यासोबत  54 धावांची भागिदारी करत मुंबईच्या डावाला आकार दिला. त्यानंतर सूर्यकुमार यादवसोबत मुंबईला विजयाच्या दिशेन नेहले. सूर्यकुमार यादव याने 31 चेंडूत 66 धावांचा पाऊस पाडला. सूर्यकुमार यादव याने वादळी फलंदाजी करत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सूर्यकुमार यादव याने आपल्या खेळीत दोन षटकार आणि आठ चौकार लगावले. 


तिलक वर्मा-टिम डेविडचा फिनिशिंग टच - 


सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन बाद झाल्यानंतर टिम डेविड आणि तिलक वर्मा यांनी फिनिशिंग टच दिला. दोघांनी पंजाबची गोलंदाजी फोडून काढली.  तिलक वर्मा आणि टिम डेविड यांनी 16 चेंडूत नाबाद 38 धावांची विजयी भागिदारी केली. टिम डेविड याने 10 चेंडूत तीन चौकारांसह 19 धावांचे योगदान दिले. तर तिलक वर्मा याने 10 चेंडूत 26 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये तीन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. 


कॅमरुन ग्रीनची छोटेखानी खेळी


रोहित शर्मा याला शून्यावर बाद करत पंजाबने दमदार सुरुवात केली. पंजाब दुसऱ्यांदा मुंबईचा पराभव करणार अशी परिस्थिती होती की काय असे झाले... पण सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी वादळी फलंदाजी करत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर ग्रीन आणि ईशान यांनी मुंबईचा डाव सावरला. कॅमरुन ग्रीन याने 18 चेंडूत 23 धावंची खेळी केली. या खेळीत त्याने चार चौकार लगावले. 


अर्शदीपची महागडी गोलंदाजी -


पंजाबची गोलंदाजी सर्वसाधारण राहिली. 2015 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना पंजाबने चांगली सुरुवात केली. पण त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. पंजाबकडून नॅथन इलिस याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. अर्शदीप सिंह याने 3.5 षटकात 66 धावा खर्च केल्या. अर्शदीपच्या प्रत्येक षटकात सरासरी 18 धावा काढण्यात आल्या.. ऋषी धवन याने तीन षटकात 20 धावांच्या मोबदल्यात 20 धावा दिल्या. सॅम करन यालाही तीन षटकात 41 धावा चोपल्या.