Women's IPL 2023 : बहुप्रतिक्षीत महिला आयपीएलचं आयोजन लवकरच होणार असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला आयपीएलसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान पुरुषांची आयपीएल 2023 1 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता असून महिला आयपीएलचा आगामी हंगाम 3 ते 26 मार्च दरम्यान खेळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही स्पर्धा भारतात खेळल्या जातील. बीसीसीआयने अद्याप तारखा जाहीर केल्या नसल्या तरी महिला टी20 विश्वचषक फायनल जी केपटाऊन येथे 26 फेब्रुवारीला होणार आहे त्याच्या एका आठवड्यानंतर महिला आयपीएल सुरु होण्याची शक्यता आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोने समोर आणलेल्या माहितीनुसार बीसीसीआय महिला आयपीएलची अंतिम तारीख निश्चित करण्यापूर्वी परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेवर काम करत आहे. 


मीडिया राईट्ससाठी अर्ज मागवले


बीसीसीआयने पहिल्या पाच सीझनचे मीडिया हक्क विकण्यासाठी अर्ज मागवले आहेत. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने एक निविदा जाहीर केली आहे. या निविदेतंर्गत 2023-27 पर्यंत महिला IPL च्या मीडिया हक्कांच्या खरेदीसाठी अर्ज मागवले गेले आहेत. ज्यांना माध्यमांचे अधिकार विकत घ्यायचे आहेत त्यांना या निविदेअंतर्गत कागदपत्रे सादर करावी लागतील आणि त्यानंतर बोली लावून हक्क मिळवता येतील.  निविदा प्रक्रियेत बिडिंग पद्धती, मीडिया हक्क पॅकेज आणि इतर माहितीबद्दल अधिक डिटेल्स दिले गेले आहेत. पाच लाख रुपये जमा करणाऱ्यांनाच मीडिया अधिकार मिळवता येणार आहेत. दरम्यान हे पाच लाख रुपये नॉन रिफन्डेबल असणार असून मीडिया अधिकार मिळाले किंवा नाही तरीही हे पाच लाख रुपये परत केले जाणार नाहीत. 31 डिसेंबरपर्यंत पेपर्स खरेदी करता येणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.  


Womens IPL संघाची नावं कशी असतील?


क्रिकेट वेबसाईट क्रिकबझनं दिलेल्या वृत्तानुसार, बोर्डानं अद्याप महिला आयपीएल संघ शहरांच्या नावावर किंवा झोनच्या नावावर विकण्याचा निर्णय घेतलेला नाही. संघ क्षेत्रानुसार विकले गेल्यास ते उत्तर (जम्मू/धर्मशाला), दक्षिण (कोची/विशाखापट्टणम), मध्य (इंदूर/नागपूर/रायपूर), पूर्व (रांची/कटक), उत्तर पूर्व (गुवाहाटी) आणि  पश्चिम (पुणे/राजकोट) असं असण्याची शक्यता आहे.  ज्या ठिकाणी पुरूष आयपीएलचे सामने खेळले जात नाहीत, अशा ठिकाणीच महिला आयपीएल लीगमधील सामन्यांचं आयोजन केलं जाऊ शकतं.


हे देखील वाचा-