IPL 2023, PBKS vs GT : शुभमन गिलच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर गुजरात टायटन्सने पंजाबचा सहा विकेटने पराभव केला. गुजरातचा हा चार सामन्यातील तिसरा विजय होय. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी सात धावांची गरज होती. पण सॅम करन याने भेदक मारा करत जम बसलेल्या शुभमन गिल याला बाद करत सामना रंगतदार अवस्थेत नेला. पण राहुल तेवातियाने चौकार मारत गुजरातला विजय मिळवून दिला. पंजाबने दिलेले 154 धावांचे आव्हान गुजरातने सहा विकेट आणि एक चेंडू राखून पार केले. 


पंजाबने दिलेल्या 154 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने दमदार सुरुवात केली. शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी पावरप्लेमध्ये चौकार अन् षटकारांचा पाऊस पाडत सामना एकाकी झुकवला. वृद्धीमान साहा याला 30 धावांवर बाद करत रबाडाने पंजाबला पहिले यश मिळवून दिले. साहाने 19 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 30 धावांची खेळी केली.  रबाडाची आयपीएलमधील ही शंभरावी विकेट ठरली. 64 डावात त्याने 100 विकेट घेण्याचा पराक्रम केला.  साहा बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरातचा डाव सावरला. दोघांनी सयंमी फलंदाजी करत धावसंख्या हालती ठेवली. पण अर्शदीप सिंह याने साई सुदर्शनला बाद करत रंगत वाढवली. साई सुदर्शन याने 20 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले.  यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. साई सुदर्शन बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याही लगेच तंबूत परतला. त्याला फक्त आठ धावा करता आल्या. त्यासाठी हार्दिकने 11 चेंडूचा सामना केला. हार्दिक बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि डेविड मिलर यांनी डाव सांभाळला. सामना गुजरातच्या बाजूने झुकला असे वाटत असतानाच सॅम करन याने अखेरच्या षटकात गिल याला बाद केले. शुभमन गिल याने 49 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या खेळीत गिल याने सात चौकार आणि एक षटकार लगावला. डेविड वॉर्नर आणि राहुल तेवातिया यांनी गुजरातला विजय मिळवून दिला. डेविड मिलर याने 18 चेंडूत 17 धावांचे योगदान दिले तर राहुल तेवातिया याने दोन चेंडूत पाच दावा केल्या. 


पंजाबकडून रबाडा आणि अर्शदीप हे आघाडीचे गोलंदाज महागडे ठरले. रबाडाने चार षटकात 36 धावा खर्च केल्या तर अर्शदीप याने चार षटकात 33 धावा दिल्या. हरप्रीत ब्रार याने चार षटकात 20 धावा दिल्या. तर सम करन याने 3.5 षटकात अवघ्या 25 धावा खर्च केल्या. अर्शदीप सिंह, कगिसो रबाडा, हरप्रीत ब्रार आणि सॅम करन यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. राहुल चहर याला एकही विकेट मिळाली नाही. 


दरम्यान, गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 153 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. पंजाबचा कर्णधार शिखर धवनही स्वस्तात बाद झाला. गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत पंजाबच्या फलंदाजांना ठरावीक अंताराने तंबूत पाठले. मॅथ्यू शॉर्ट याने पंजाबकडून सर्वाधिक धावांची खेळी केली. शॉर्ट याने 24 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. तर शाहरुख खान याने 9 चेंडूत 22 धावा ठोकत पंजाबला सन्मानजक धावसंख्या उभारुन दिली 


नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. प्रभसिमरन याला दुसऱ्याच चेंडूवर शमीने तंबूत पाठवले. त्यानंतर फॉर्मात असेलला शिखर धवनही लवकरच बाद झाला. शिखर धवनला जोशवा लिटल याने आठ धावांवर बाद केले. त्यानंतर मॅथ्यू शॉर्ट आणि भानुका राजपक्षे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण राशिद खान याने ही जोडी फोडली. राशिद खान याने मॅथ्यू शॉर्ट याला 36 धावांवर बाद केले. मॅथ्यू शॉर्ट याने 24 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने सहा चौकार आणि एक षटकार लगावला. 


मॅथ्यू शॉर्ट बाद झाल्यानंतर युवा जितेश शर्मा याने भानुका राजपक्षे याच्यासोबत पंजाबच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण मोहित शऱ्मा याने जितेश शर्मा याला बाद करत ही जोडी फोडली. जितेश शऱ्मा याने 23 चेंडूत 25 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार लगावले. जितेश थंबूत परतल्यानंतर अल्जारी जोसेफ याने भानुका राजपक्षे याचा अडथळा दूर केला. राजपक्षे याने 26 चेंडूत 20 धावांची खेळी केली. 


अखेरच्या षटकात सॅम करण याने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. पण मोहित शर्मा याने सॅम करन याला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. सॅम करन याने एक चौकार आणि एका षटकारासह 22 धावांचे योगदान दिले. शाहरुख खान याने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. शाहरुख खान याने 9 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले. शाहुख खान याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. पण धाव घेण्याच्या प्रयत्नात शाहरुख धावबाद झाला. शाहरुखच्या फिनिशिंग टचमुळे पंजाबचा संघ 150 पार पोहचला. हरप्रीत ब्रार याने पाच चेंडूत 8 धावांचे योगदान दिले.  



हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवता ठरावीक अंतरावर पंजाबच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. पंजाबच्या फलंदाजांना एकही मोठी भागिदारी करु दिली नाही. पंजाबकडूनची सर्वात मोठी भागिदारी 37 धावांची झाली. यावरुनच गुजरातच्या गोलंदाजांची कामगिरी समजू शकतो. पंजाबकडून मोहित शर्मा याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या आहेत. मोहित शर्मा याने तीन चार षटकात 18 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. राशिद खान, अल्जारी जोसेफ, जोशुआ लिटल आणि मोहम्मद शामी यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.