IPL 2022 : नव्या रंगात... नव्या ढंगात... आयपीएलचा नवा मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा रणसंग्रामाला अवघे काही तास उरले आहेत. शनिवारी सायंकाळी आयपीएलचं बिगुल वाजणार आहे. गतविजेते चेन्नई सुपरकिंग्स  आणि उपविजेते कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार आहे. यंदा आयपीएलमध्ये दोन नव्या संघाची भर पडली आहे, त्यामुळे एकूण संघाची संख्या दहा झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील चार मैदानावर 70 सामने होणार आहे. तब्बल दोन महिने आयपीएलचा कुंभमेळावा रंगणार आहे. मागील 14 वर्ष आयपीएलनं भारतासह जगभरातल्या क्रिकेटप्रेमींना मनोरंजनाचा बंपर डोस दिला. पण यंदाच्या नव्या मोसमात बीसीसीआयनं स्पर्धेच्या रुपरेषेत अनेक बदल केले आहेत...


आयपीएल 2022 मध्ये नवं काय? 
- यंदाच्या आयपीएलमध्ये आठऐवजी दहा संघ असणार आहेत
- दहा संघांची दोन व्हर्च्युअल गटात विभागणी करण्यात आलीय
- मुंबई, कोलकाता, राजस्थान, दिल्ली आणि लखनौ एका गटात
- तर चेन्नई, हैदराबाद, बंगलोर, पंजाब आणि गुजरातचा दुसऱ्या गटात समावेश आहे...
- यातील प्रत्येक संघ आपल्या गटातील चारही संघांशी आणि समोरच्या गटातील एका संघाशी प्रत्येकी दोन सामने खेळेल
- तर दुसऱ्या गटातील इतर चार संघांशी एकेक सामना खेळेल
- त्यामुळे दहा संघ असले प्रत्येक संघ आधीप्रमाणे 14 च साखळी सामने खेळेल 


आयपीएलच्या नव्या मोसमाआधी मेगा लिलाव पार पडला होता. जवळपास सगळ्या फ्रँचायझींनी आपल्या संघात मोठे बदल केलेले पाहायला मिळणार आहेत. गेली अनेक वर्ष मुंबई इंडियन्सचा भाग असलेला हार्दिक पंड्या यंदा नव्यानं दाखल झालेल्या गुजरात संघाचा कर्णधार आहे. तर लोकेश राहुलनं नवख्या लखनौ संघाची कमान सांभाळलीय. महत्वाची बाब ही की दिल्लीतून कोलकात्याच्या ताफ्यात सामील झालेला मुंबईचा श्रेयस अय्यर तिथला कर्णधारही बनलाय. विराट कोहली आणि धोनी यंदा खेळाडू म्हणून खेळणार आहेत. धोनीने चेन्नईचं कर्णधारपद सोडलेय, तर विराट कोहली आरसीबीच्या कर्णधारपदावरुन पायउतार झालाय. त्यामुळे संघ बदलले आहेत. खेळाडू बदलले आहेत. इतकेच नाही तर मैदानंही बदलली आहेत. पण प्रत्येक सामन्यागणिक वाढणारी उत्सुकता, उत्कंठावर्धक सामने आणि स्पर्धेचा जोश सुरुवातीपासून शेवटपर्यंत तसाच राहणार आहे. आयपीएलची हीच खासियत आहे. आणि तेच या स्पर्धेचं वेगळेपण आहे. तेव्हा आयपीएलच्या नव्या मोसमासाठी सज्ज व्हा.