RCB vs SRH: हैदराबादच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीची फलंदाजांनी चक्क लोटांगण घातलं. मार्को जानसन आणि नटराजन यांच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीचा संपूर्ण संघ 16.1 षटकात 68 धावांत संपुष्टात आला. आरसीबीच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. सुयेश प्रभुदेसाईनं आरसीबीकडून सर्वाधिक धावा कोल्या. सुयेश प्रभुदेसाईने 15 धावांची खेळी केली. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेकीचा कौल जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी आग ओकणारी गोलंदाजी केली. दुसऱ्याच षटकात आरसीबीचे आघाडीचे तिन्हीही फलंदाज माघारी परतले. विराट कोहली आणि अनुज रावत यांनाही एकाही धाव काढता आली नाही. तर फाफ डु प्लेसिस 5 धावा काढून बाद झाला. ग्लेन मॅक्सेवलही 12 धावा काढून नटराजनचा शिकार झाला. 


आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही - 
हैदराबादच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीच्या आठ फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. विराट कोहली अनुज राव आणि दिनेश कार्तिक शून्य धावसंख्येवर बाद झाले. तर फाफ डु प्लेसिस 5, शाबाज अहमद 7, हर्षल पटेल 4, वानंदु हसरंगा 8, मोहम्मद सिराज 2 धावा काढून बाद झाले. आरसीबीच्या फलंदाजापेक्षा अतिरिक्त धावसंख्या जास्त होत्या. आरसीबीला अतिरित्क 12 धावा मिळाल्या. त्याबळावर आरसीबीने 60 धावांचा टप्पा पार केला, असे म्हटल्यास वावगे वाटायला नको. 


हैदराबादचा भेदक मारा - 
पहिल्या षटकांपासून हैदाराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा केली. मार्को जानसन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी तीन तीन बळी घेतले. तर जगतीश सुचितला दोन विकेट मिळाल्या. भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 


एकही षटकार नाही - 
हैदराबादच्या गोलंदाजीसमोर आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. एकाही फलंदाजाला षटकार मारता आला नाही. आरसीबीकडून फक्त सहा चौकार लगावण्यात आले. यात मॅक्सेवलने दोन तर फाफ डु प्लेसिस, सुयेश प्रभुदेसाई, शाबाज अहमद आणि वानंदु हसरंगा यांन प्रत्येकी एक एक चौकार लगावले.