IPL 2022 : भारतीय संघातील दोन प्रमुख फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या खराब फॉर्ममध्ये आहेत. दोघांचीही बॅट सध्या शांत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमधील आपल्या पहिल्या सामन्यात 41 धावांची खेळी केली होती. हा अपवाद वगळता रोहितला एकदाही 30 पेक्षा जास्त धावा काढता आलेल्या नाहीत. रोहित शर्माला सात डावात फक्त 114 धावा करता आल्यात. तर  विराट कोहलीलाही आपल्या लौकिकानुसार कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीने सात डावात फक्त 119 धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात 41 धावांची खेळी केल्यानंतर विराट कोहलीला एकदाही 30 पेक्षा जास्त धावा काढता आल्या नाहीत.  भारतीय संघाचे दोन प्रमुख फलंदाज अपयशी ठरत असल्यामुळे चाहते निराश झाले आहेत. आगामी काही दिवसांमध्ये टी 20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. रोहित आणि विराट यांच्या फॉर्मवर माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकरच फॉर्ममध्ये परत येतील असा विश्वास सुनिल गावसकर यांनी व्यक्त केलाय. 


सुनिल गावसकर म्हणाले की, फक्त एक चांगला डाव रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा फॉर्म परत येण्यास मदत करु शकतात. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावसकर म्हणाले की, फॉर्म नेहमी एक डाव दूर असतो. एखादा डावात तुमची चांगली फलंदाजी केली तर तुमचा आत्मविश्वास वाढतो अन् फॉर्म परत येतो. मुंबई इंडियन्सने हेच लक्षात ठेवायला हवं. कारण रोहित शर्मा फॉर्मात परतल्यानंतर संघाचा नक्कीच फायदा होईल. एखादा दिग्गज फलंदाज फार्मात नसेल तर त्याचा परिणाम संघावर होतो. लवकरच रोहित शर्मा फॉर्ममध्ये परत येईल.  


विराट कोहली बद्दल बोलताना गावसकर म्हणाले की, रोहित प्रमाणेच कोहलीचाही फॉर्म नाही. कोहलीची पहिली चूक शेवटची चूक ठरत आहे.  रोहित आणि विराट कोहली आपल्या फॉर्मपासून फक्त एक डाव दूर आहेत. एखाद्या डावात विराट -रोहित चांगली फलंदाजी करतील तेव्हापासून ते फॉर्ममध्ये परत येतील. ते लवकरच मोठी खेळी करतील.