RCB vs CSK : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुने चेन्नई सुपरकिंग्सचा (RCB vs CSK)13 धावांनी पराभव केला आहे. बंगळुरुच्या गोलंदाजांनी केलेल्या अफलातून कामगिरीमुळे चेन्नईला पराभव पत्करावा लागला. चेन्नईकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वेने अर्धशतक झळकावत एकहाती झुंज दिली. पण त्याला साथ न मिळाल्याने अखेर चेन्नई पराभूत झाली आहे. 



सामन्यात नाणेफेक जिंकत चेन्नईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. त्यानंतर फाफने कोहलीसोबत सुरुवातही चांगली केली. अर्धशतकी भागिदारी झाल्यानंतर 38 धावांवर फाफ बाद झाला. त्यानंतर कोहलीही 30 धावांवर बाद झाला. रजतने 21 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, पण माहिपाल लोमरोरने ठोकलेल्या 42 तुफानी धावा संघासाठी महत्त्वाच्या ठरल्या. त्यानंतर अखेरच्या षटकात काही षटकार ठोकत दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) केलेल्या नाबाद 26 धावा संघाची धावसंख्या 173 पर्यंत नेण्यात महत्त्वाच्या ठरल्या.  


कॉन्वेची एकाकी झुंज व्यर्थ


174 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नई संघाची सुरुवात ठिक झाली. सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली खेळी करण्यास सुरुवात केली. पण 28 धावा करुन गायकवाड बाद झाला. त्यानंतरही कॉन्वेने झुंज कायम ठेवली. पण त्याला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने अखेर 37 चेंडूत 56 धावा करुन तोही बाद झाला. त्यानंतर मोईन अलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण हर्षलने त्याला 34 धावांवर बाद करत चेन्नईच्या अडचणी वाढवल्या. अखेर हेझलवुडने धोनीला बाद करत चेन्नईपासून विजय फार दूर नेला. त्यामुळे 13 धावांनी अखेर चेन्नईने सामना गमावला. बंगळुरुच्या गोलंदाजांनी सुमार गोलंदाजी केली मात्र संघाला विजय मिळवून देण्यासाठी ही पुरेशी होती. यात हर्षल पटेलने सर्वाधिक 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. मॅक्सवेलने दोन तर हसरंगा, हेझलवुड आणि अहमदने प्रत्येकी एक विकेट घेतली.


हे देखील वाचा-