IPL 2022 Updates : आयपीएल (IPL) स्पर्धेने भारतीय क्रिकेटला अनेक स्टार खेळाडू दिले. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, ऋतुराज गायकवाड असे एक न अनेक हिरे आयपीएलमधून भारतीय संघात आले. पण काही खेळाडूंची कारकिर्द उतरणीलाही आयपीएलमधूनच लागली. यात असाही एक खेळाडू आहे ज्याने अफलातून गोलंदाजीच्या जोरावर 2014 मध्ये पर्पल कॅप जिंकली. पण आज 2022 मध्ये तो गुजरात टायटन्समध्ये नेट बोलर म्हणून कामगिरी पार पाडणार आहे. हा खेळाडू म्हणजे एकेकाळी भारतीय संघात फिक्स जागा असणारा 'मोहित शर्मा (Mohit Sharma)'.


मोहित एकेकाळी धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स संघातील स्टार खेळाडू होता. त्याने 2014 साली तर 16 सामन्यात तब्बल 23 विकेट्सही घेतल्या होत्या. त्यामुळे त्या सीजनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यासाठी त्याला पर्पल कॅपही देण्यात आली होती. त्याचदरम्यान 2014 टी20 विश्वचषक आणि 2015 विश्वचषकात तो भारतीय संघातही होता. पण मागील काही वर्षात त्याचा फॉर्म अतिशय खराब झाला. चेन्नईतून दिल्ली संघात गेल्यानंतर खराब फॉर्ममुळे त्याला अधिक संधी मिळाली नाही. अखेर तो संघातून बाहेर पडल्याने त्याला कोणी रिटेन देखील केले नाही. त्यानंतर आता नव्याने स्थापन झालेल्या गुजरात टायटन्स संघाच्या सरावावेळी मोहित मैदानात दिसला आहे. त्यामुळे तो नेट बोलर असल्याचं सर्वांसमोर आलं असून सोशल मीडियावर अनेक युजर्स त्याच्यावर आलेल्या या परिस्थितीबाबत खंतही व्यक्त करत आहेत.



गुजरातची बोलिंग आहे ताकदवर बाजू 


गुजरात टायटन्स संघाचा विचार करता त्यांच्याकडे असणारा बोलिगं अटॅक त्यांची सर्वात जमेची बाजू आहे. कारण संघात जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू राशिद खान आहे. सोबत वेगवान गोलंदाजीसाठी लॉकी फर्ग्यूसन आणि मोहम्मद शमी सारखे दिग्गज आहेत. नवखा पण उत्तम असा अल्झारी जोसेफही गुजरातमध्ये असून अनुभवी जयंत यादव आणि आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असणारा राहुल तेवतिया संघात आहे. 


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha