Punjab Kings Team Preview : इंडियन प्रिमीयर लीगचं यंदाचं पर्व अगदीच चुरशीचं होणार यात शंका नाही, कारण सर्वात पहिलं म्हणजे 8 जागी 10 संघ सामने खेळणार आहेत. त्यात महालिलावामुळे बऱ्याच संघातील खेळाडूच काय कर्णधारही बदलले आहेत. यातीलच एक संघ म्हणजे पंजाब किंग्स. पंजाबचा कर्णधार केएल राहुल नवा संघ लखनौच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी गेल्याने पंजाब संघाची जबाबदारी सलामीवीर मयांक अगरवालकडे (Mayank Agarwal) देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या कर्णधारासह पंजाबचा संघ कशी कामगिरी करेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.  


महालिलावाचा विचार करता त्यापूर्वी संघाने मयांक अगरवाल आणि युवा गोलंदाज अर्शदीप सिंग यांना संघात कायम ठेवलं होतं. त्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये शिखर धवन, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, शाहरुख खान, राहुल चहर, लियाम लिव्हिंगस्टोन यांच्यावर कोट्यवधी खर्च केले आहेत. संघाकडे पाहता संघाची गोलंदाजी चांगली असताना फलंदाजीतर आणखी तगडी आहे.


दमदार फलंदाजी संघाची ताकदवर बाजू


संघाची सर्वात जमेची बाजू पाहिली तर संघाची फलंदाजीच आहे. मयांक सारखा दमदार सलामीवीर असताना त्याला जोडीला डावखुरा सलामीवीर शिखर धवन संघात आला आहे. या दोघांमुळे संघाचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. त्यानंतर जॉनी, भानुका, शाहरुख लियाम या धाकड फलंदाजांमुळे समोरच्या संघातील गोलंदाजांना धडकी नक्कीच भरेल.


गोलंदाजीतही विविधता


संघाच्या गोलंदाजीचा विचार करता त्यांनी मागील आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या अर्शदीपला संघात कायम ठेवलं होतं. त्यानंतर आता स्टार गोलंदाज कागिसोला संघात घेतल्याने संघाची ताकद आणखी वाढली आहे. यासोबत संदीप शर्मा, शाहरुख खान यांच्यासह फिरकीमध्ये राहुल चहर, हरप्रीत ब्रार हे ऑप्शन आहेत. त्यामुळे संघाची गोलंदाजीही दमदार आहे.


दमदार संघ असूनही आतापर्यंत खराब कामगिरी 


पंजाबचा संघ यंदा एकदम दमदार दिसत आहे. पण आतापर्यंतचा त्यांचा इतिहास पाहता संघ याआधीही कमाल खेळाडू खेळवूनही कधीच ट्रॉफीपर्यंत पोहोचलेला नाही. एकदाच सेमीपर्यंत पोहोचलेल्या पंजाबमध्ये सेहवाग, गेलपासून युवराज, राहुल असे अनेक महारथी होते. पण तरीही संघाला कधीच खास कामगिरी करता आलेली नाही. यामुळे संघाचा आतापर्यंतचा हा इतिहास यंदाही संघाला त्रासदायक ठरणार की मयांक इतिहास बदलणार हे पाहावे लागेल. 


पंजाब किंग्सचा संघ


मयांक अगरवाल (कर्णधार) (12 कोटी),अर्शदीप सिंह (4 कोटी), शिखर धवन (8.25 कोटी),कागिसो रबाडा (9.25 कोटी), जॉनी बेअरस्टो (6.75 कोटी), शाहरुख खान (9 कोटी), राहुल चहर (5.25 कोटी), हरप्रीत ब्रार (3.8 कोटी), प्रभसिमरन सिंह (60 लाख), जितेश शर्मा (20 लाख), इशान पोरेल (25 लाख), लियाम लिव्हिंगस्टोन (11.5 कोटी), ओडियन स्मिथ (6 कोटी), संदीप शर्मा (50 लाख), राज बावा (2 कोटी), ऋषी धवन (55 लाख), प्रेरक मंकड (20 लाख), वैभव अरोरा (2 कोटी), आर. चॅटर्जी (20 लाख), बलतेज सिंह (20 लाख), अंश पटेल (20 लाख), नॅथन एलिस (75 लाख), अथर्व तायडे (20 लाख), बेनी हॉवेल (40 लाख), भानुका राजपक्षे (50 लाख).


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha