IPL 2022 RCB : आयपीएलच्या मेगा लिलावात आरसीबीने काही दर्जेदार भारतीय आणि विदेशी खेळाडूंची खरेदी केली. देवदत्त पडिक्कल आणि युजवेंद्र चहल यासारखे प्रतिभावंत खेळाडू यंदा आरसीबीकडून खेळणार नाहीत. पण आरसीबीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड, श्रीलंकेचा अष्टपैलू वानिंदु हसरंगा आणि कॅरेबियन शेरफेन रदरफोर्ड यासारख्या दर्जेदार खेळाडूंना संघात घेतलं आहे. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंना लिलावापूर्वी रिटेन करण्यात आले होते. प्रत्येक हंगामाप्रमाणे यंदाही आरसीबी कागदावर मजबूत संघ दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या 14 आयपीएल स्पर्धेत आरसीबीला एकदाही चषक उंचावता आलेला नाही. 2009, 2011 आणि 2016 मध्ये आरसीबीला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण, यंदा आरसीबी संघ इतिहास बदलण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. यंदा आरसीबीचं कर्णधारपद दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू फाफ डु प्लेसिस याच्याकडे सोपवण्यात आले आहे. पाहूयात काय आहे आरसीबीची ताकद आणि कमजोरी....


आरसीबीची ताकद :
आरसीबीकडे यंदा घातक गोलंदाजांचा भरणा आहे. त्यामुळे डेथ ओव्हरमधील समस्या कमी झालेली असेल. मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड नवीन चेंडूने मारा करतील. हर्षल पटेल, जेसन बेहरेनडॉर्फ, सिद्धार्थ कौल आणि इंग्लंडचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज डेविड विली यांच्या रुपाने आरसीबीकडे दर्जेदार वेगवान मारा असेल. याशिवाय जर विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस सलामीला आले तर समोरील संघाच्या अडचणी वाढतील. प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज दबावात राहतील. 


आरसीबीची कमजोरी काय?
'मिस्टर 360' एबी डिव्हिलिअर्सने नोव्हेंबर 2021 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे यंदा एबी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. एबी नसल्यामुळे आरसीबीला मधल्या षटकांत वेगाने धावा करणाऱ्या फलंदाजाची कमी जाणवणार आहे. एबी फक्त मधल्या षटकातच नव्हे डेथ ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पाडत होता. त्यामुळे एबीच्या जागा कोण भरणार हा प्रश्न आरसीबीला सतावत असेल. एबीच्या अनुपस्थितीत ग्लेन मॅक्सवेलवर अधिक जबाबदारी असणार आहे. दिनेश कार्तिककडेही सर्वांच्या नजरा असतील. दिनेश कार्तिक अखेरच्या षटकांत कशा पद्धतीने धावा काढतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  


फलंदाजी क्रमवारीवरुन आरसीबी संभ्रमात :
लिलावात आरसीबीने अनेक दर्जेदार खेळाडूंना खरेदी केले आहे. पण नेहमीप्रमाणेच  संघ व्यवस्थापन फलंदाजीच्या क्रमवारीवरुन संभ्रमात आहे. विराट कोहली पुन्हा सलामीला येणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विराट कोहली सलामीला आल्यास दुसऱ्या क्रमांकावर कुणाला संधी द्यायची, ही आरसीबीसाठी डोकेदुखी ठरु शकते. युवा अनुज रावत आणि फाफ डु प्लेसिस सलामीला येऊ शकतात. विराट तिसऱ्या आणि मॅक्सवेल चौथ्या क्रमांकावर येऊ शकतात. पाचव्या क्रमांकावर कार्तिक आणि सहाव्या क्रमांकावर महिपाल लोमरोर यांना संधी दिली जाऊ शकते.  मागील काही आयपीएलमध्ये आरसीबीला संघाचं संतुलन साधण्यात अपयश आले होते. दर्जेदार खेळाडू असतानाही कुणाला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं, हे न सुटलेलं कोडं आहे.


आरसीबीचा संघ :
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, वनिंदु हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेजलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन एलेन, शेरफेन रदरफोर्ड, जेसन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चामा मिलिंद, अनीश्वर गौतम, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, लवनीत सिसोदिया, डेविड विली