IPL 2022, PBKS vs MI : पाच वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या हंगामात लागोपाठ पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुण्याच्या एमसीए मैदानावर झालेल्या सामन्यात मयांक अग्रवालच्या नेतृत्वातील पंजाबने मुंबईचा 12 धावांनी पराभव केला. पंजाबने दिलेल्या 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ निर्धारित 20 षटकात 9 बाद 186 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून रोहित शर्मा, इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. ओडियन स्मिथने चार विकेट घेतल्या. 


'बेबी एबी'चं वादळ
बेबी एबी म्हणून ओळखला जाणाऱ्या  डेवाल्ड ब्रेविसची (Dewald Brevis) वादळी फलंदाजी पुण्याच्या एमसीए मैदानावर पाहायला मिळाली. पंजाबने दिलेल्या 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. दोन्ही सलामी फलंदाज लवकर तंबूत परतले होते. मुंबईच्या अडचणी वाढल्या होत्या. यावेळी डेवाल्ड ब्रेविसची मैदानार एन्ट्री झाली. ब्रेविस सुरुवातील संथ खेळत होता. पहिल्या आठ चेंडूवर ब्रेविस याने संथ फलंदाजी केली. मात्र, फिरकीपटू राहुल चाहरच्या पहिल्याच षटकात वादळी फलंदाजीचा नमुना दाखवला. राहुल चाहरच्या या षटकात ब्रेविसने तब्बल 29 धावा चोपल्या. इतकेच नाही तर अखेरच्या चार चेंडूवर बेबी एबीने सलग चार षटकार लगावले. ब्रेविसच्या तुफानी फलंदाजीनंतर रोहित शर्माला मैदानावर येण्याचा मोह आवरला नाही. राहुल चाहरचं षटक संपल्यानंतर रोहित शर्मा तात्काळ मैदानावर आला. त्याने युवा ब्रेविसला मिठ्ठी मारत आनंद साजरा केला. 18 वर्षीय डेवाल्ड ब्रेविसने 25 चेंडूत 49 धावा काढून बाद झाला. या खेळीदरम्यान ब्रेविस याने चार चौकार आणि पाच षटकार लगावले.


सूर्याकुमारचे अपुरे प्रयत्न - 
डेवाल्ड ब्रेविस याने तुफानी फटकेबाजी करत मुंबईला विजय दृष्टीक्षेपात आणून दिला होता. मात्र, मोक्याच्या क्षणी दोन विकेट पडल्यामुळे मुंबईचा संघ अडचणीत सापडला होता. एकीकडे विकेट पडत असताना सूर्यकुमार याने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली होती. सूर्यकुमार यादवने पंजाबच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. पण मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार यादव बाद झाला. सूर्यकुमार यादवने 30 चेंडूत 43 धावांची खेळी केली.  या खेळीदरम्यान सूर्यकुमार यादवने चार षटकार लगावले. सूर्यकुमार यादव मैदानावर असताना सामना मुंबईच्या बाजूने झुकला होता. 


मुंबईच्या पराभवाचं कारण काय?
रोहित शर्मा (28), ईशान किशन (3) आणि कायरन पोलार्ड (10) या दिग्गज फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. त्यामुळेच मुंबई संघाला सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या फलंदाजांना मोठी भागिदारी कऱण्यातही अपयश आले. मुंबईच्या फंलदाजांमध्ये ताळमेळ नसल्याचेही दिसून आले. पोलार्ड आणि तिलक वर्मा हे दोन खेळाडू मोक्याच्या क्षणी धावबाद झाले, याचा फटका मुंबईला बसला. 


पंजाबचा भेदक मारा - 
199 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना पंजाबच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर गोलंदाजी केली. त्यांना क्षेत्ररक्षकांनी चांगली साथ दिली. पंजाबकडून ओडियन स्मिथने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर कगिसो रबाडाने दोन विकेट घेतल्या. मुंबईचे दोन फलंदाज धावबाद झाले. 


मयांक-शिखरची दमदार फलंदाजी -
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मयांक आणि स्टार फलंदाज शिखरच्या अर्धशतकाने पंजाबने 198 धावांचा डोंगर उभा केला. मयांकने 52 धावांची विस्फोटक फलंदाजी केली. मयांक बाद झाल्यानंतर शिखरने सर्व सुत्रे आपल्याकडे धेत फटकेबाजी करण्यास केली. बेअरस्टोने त्याला काहीशी साथ दिली, पण बेअरस्टो 12 धावा करुनच तंबूत परतला. शिखर धवनही 70 धावांवर झेलबाद झाला. चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या काही षटकात पंजाबची फलंदाजी ढासळत होती. पण अखेरच्या काही षटकात जितेश शर्मा आणि शाहरुख खान यांनी पुन्हा स्फोटक फलंदाजी दाखवली. जितेशने 15 चेंडूत 30 तर शाहरुखने 6 चेंडूत 15 धावा केल्या. ज्यामुळे पंजाबचा स्कोर 198 धावांपर्यंत पोहोचला. मुंबईकडून बसिल थम्पीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर जयदेव उनाडकद, जसप्रीत बुमराह, एम अश्विन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.