MI vs PBKS, IPL 2022 : पुण्याच्या एमसीए मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किग्स यांच्यादरम्यान आयपीएलच्या 15 व्या हंगमातील 23 वा सामना सुरु आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने मोठी कामगिरी केली आहे. रोहित शर्माने 25 धावा करताच टी 20 क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा दुसरा भारतीय खेळाडू आहे. रोहित शर्माआधी विराट कोहलीने टी 20 क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. दरम्यान, पंजाबने दिलेल्या 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दणक्यात सुरुवात केली. रोहित शर्माने 17 चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकारासह 28 धावांची खेळी केली. रोहित शर्माला रबाडाने बाद करत पंजाबला पहिलं यश मिळवून दिले. 


पंजाबविरोधात खेळताना रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या. रोहित शर्माने 25 धावा करताच  हा कारनामा केला. दहा हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम करणारा रोहित दुसरा भारतीय खेळाडू ठरला. याआधी टी 20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने दहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. जागतिक क्रिकेटचा विचार केला तर सर्वाधिक धावा ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने टी 20 क्रिकेटमध्ये 14562 धावा केल्या आहेत. गेलने 463 सामन्यात हा कारनामा केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा शोएब मलिक आहे. मलिकने 11 हजार 698 धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीने 330 सामन्यात 10379 धावा चोपल्या आहेत. यामध्ये पाच शतके आणि 76 अर्धशतकांचा समावेश आहे. टी 20 मध्ये सर्वाधिक धावा असणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा सध्या सातव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने आतापर्यंत  375 सामन्यात 10003 धावा चोपल्या आहेत. 




टी 20 क्रिकेटमधील दहा हजारी मनसबदार
ख्रिस गेल 14562
शोएब मलिक 11698
कायरन पोलार्ड 11474
फिंच 10499
विराट कोहली 10379
डेविड वार्नर 10373
रोहित शर्मा 10003


मुंबईला विजयासाठी 199 धावांची गरज
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मयांक आणि स्टार फलंदाज शिखरच्या अर्धशतकाने पंजाबने 198 धावांचा डोंगर उभा केला. मुंबईला विजयासाठी 199 धावांचे आव्हान देण्यात आले आहे.  मयांकने अधिक तुफान फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर 52 धावांवर तो बाद झाला. ज्यानंतर शिखरने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. बेअरस्टोने त्याला काहीशी साथ दिली, पण बेअरस्टो 12 धावा करुनच तंबूत परतला. त्यानंतर शिखरला खास कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही 70 धावांवर झेलबाद झाला. चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या काही षटकात पंजाबची फलंदाजी ढासळत होती. पण अखेरच्या काही षटकात जितेश शर्मा आणि शाहरुख खान यांनी पुन्हा स्फोटक फलंदाजी दाखवली. जितेशने 15 चेंडूत 30 तर शाहरुखने 6 चेंडूत 15 धावा केल्या. ज्यामुळे पंजाबचा स्कोर 198 धावांपर्यंत पोहोचला.