IPL 2022 : बुमराह-शामीचे पर्याय मिळाले, लवकरच या दोन वेगवान गोलंदाजांची होणार भारतीय संघात एन्ट्री


South Africa tour of India : मोहम्मद शामी आमि जसप्रीत बुमराह भारताचे आघाडीचे गोलंदाज आहेत. भारतामध्ये सातत्याने क्रिकेट खेळले जाते. त्यामुळे प्रत्येक सामन्यात या दोघांना खेळता येतेच असे नाही. त्यामुळे अनेकदा निवड समितीचं टेन्शन वाढते. पण आता निवड समितीची चिंता मिटली आहे. कारण सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये दोन गोलंदाजांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे बुमराह आणि शामी यांचा वर्कलोड कमी होण्याची शक्यता आहे. लवकर या दोन गोलंदाजांची भारतीय संघात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. 


आयपीएलच्या 15 व्या हंगमात हैदराबादकडून खेळणाऱ्या उमरान मलिक याने आणि पंजाबकडून खेळणाऱ्या अर्शदीप याने दमदार कामगिरी केली आहे. दोघांनीही घातक मारा केलाय. या दोन गोलंदाजांवर माजी क्रिकेटपटूंनी कौतुकांचा वर्षाव केलाय. तसेच त्यांना भारतीय संघात स्थान द्यावे, अशी मागणीही केली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानेही उमरान मलिक याचे कौतुक केले आहे. आयपीएलमधील कामगिरी पाहाता आयपीएलनंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकाविरोधातील टी 20 मालिकेसाठी भारतीय संघात या दोन्ही गोलंदाजाची निवड होण्याची शक्यता आहे. 
 
दक्षिण आफ्रिकाविरोधात होणाऱ्या टी 20 मालिकेसाठी  उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांना संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये दोघांनाही भेदक मारा केलाय. उमरान मलिक याने यंदाच्या हंगामात तर  145 KMPH च्या वेगाने गोलंदाजी केली आहे. त्याने 8 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय एकाच सामन्यात पाच विकेट घेण्याचा करिश्माही त्याने केलाय.  दुसरीकडे पंजाबकडून खेळणाऱ्या अर्शदीप याने अचूक टप्यावर गोलंदाजी करत फलंदाजांना बाद केलेय. डेथ षटकात अर्शदीप याने भेदक मारा करत सर्वांचे लक्ष वेधलेय. कगिसो रबाडा सारखा दिग्गज गोलंदाजही अर्शदीपच्या गोलंदाजीने प्रभावित झालाय.  


भारताला मिळणार विविध पर्याय - 
अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक यांना दक्षिण आफ्रिकाविरोधात भारतीय संघात स्थान मिळाल्यास फायद्याचे होणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी भारताला अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. भारताकडे वेळ कमी आहे, त्यामुळे नवीन गोलंदाजांना तपासून पाहण्यासाठी हीच संधी असणार आहे. दक्षिण आफ्रिकाविरोधात या दोघांची कामगिरी चांगली झाली तर वर्ल्डकपसाठी त्यांचा विचार केला जाऊ शकतो. अशातच भारतीय संघाकडे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.