Danish Kaneria On Shahid Afridi: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियानं माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर जोरदार निशाणा साधला आहे. शाहिद आफ्रिदी हा लबाड आणि  चारित्र्यहीन माणूस असल्याचं दानिश कनेरियानं म्हटलं आहे. एवढेच नव्हेतर, शाहिद आफ्रीदी संघातील इतर खेळाडूंना त्याच्याविरुद्ध भडकावायचा, असाही दानिश कनेरियानं आरोप केलाय. दरम्यान, स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 2012 मध्ये कनेरियावर बंदी घालण्यात आली होती.


दानिश कनेरिया हा पाकिस्तानकडून खेळणारा दुसरा हिंदू क्रिकेटपटू आहे. संघातील खेळाडू त्याच्याशी भेदभाव करायचे, असं शोएब अख्तरनं म्हटलं होतं. शोएब अख्तर हा पहिला खेळाडू होता ज्यानं सर्वांसमोर याबाबत भाष्य केलं. हिंदू असूनही माझ्याशी कसा भेदभाव झाला? हे त्यानं सर्वांसमोर सांगितलं. यासाठी मी शोएब अख्तरचे आभार मानतो, असं दानिश कनेरियानं न्यूज 18 शी बोलताना म्हटलं आहे. 


दानिश कनेरिया पुढे म्हणाला की, 'शाहिद आफ्रिदीने अनेकदा माझा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही दोघे फिरकीपटू म्हणून खेळायचो. परंतु, मी मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळावं, असं त्याला वाटत नव्हतं. मी पाकिस्तानच्या संघात नसावं, असं त्याला वाटायचं. तो लबाड आणि चारित्र्यहीन आहे. माझं लक्ष फक्त क्रिकेट खेळण्यावर होतं. ज्यामुळं मी अशा गोष्टींवर दुर्लक्ष करायचो. शाहित आफ्रिदी नेहमी माझ्याविरुद्ध संघातील इतर खेळाडूंना भडकावायचा, असे गंभीर आरोप दानिश कनेरियानं केले आहेत. 


दानिश कनेरियाची कारकिर्द
दानिश कनेरिया हा कसोटी क्रिकेटमध्ये 261 विकेट्स घेणारा फिरकीपटू आहे. पाकिस्तानकडून वसीम आक्रम (414), वकार युनिस (373) आणि इमरान खान (362) दानिश कनेरिया पाकिस्तानसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज आहे. कनेरियानं आपल्या 10 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत 61 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यानं 34.79 च्या सरासरीनं 261 विकेट्स घेतल्या आहेत. तर, 18 एकदिवसीय सामन्यात 45.53 च्या सरासरीनं 15 विकेट्स घेतल्या आहेत. 


हे देखील वाचा-