IPL 2022, SRH vs KKR: नितेश राणाची अर्धशतकी खेळी आणि आंद्रे रसेलचा फिनिशिंग टचच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 175 धावा केल्या. नितेश राणा याने 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तर आंद्रे रसेल याने 49 धावांची खेळी केली. तर हैदराबादकडून नटराजन आणि उमरान मलिक यांनी भेदक मारा केला. दोघांनी कोलकात्याची आघाडीची फळी उद्धवस्त केली. हैदराबादला विजयासाठी 176 धावांचे आव्हान देण्यात आले आहे.


हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. पहिल्या षटकापासूनच गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. दुसऱ्याच षटकात फिंचला बाद करत हैदराबादला पहिलं यश मिळालं. त्यानंतर कोलकात्याची फलंदाजी ढासळली. एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. फिंच (7), वेंकटेश अय्यर (6), सुनेल नारायण (6), शेल्डन जॅक्सन (7) आणि पॅट कमिन्स (3) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. कर्णधार श्रेयस अय्यर याने 28 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण उमरान मलिकच्या भेदक यॉर्करवर अय्यर बाद झाला. 


नितेश राणाचे अर्धशतक, आंद्रे रसेलचा फिनिशिंग टच - 
एका बाजूला विकेट पडत असताना नितेश राणाने संयमी फलंदाजी केली. नितेश राणाने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. राणाने 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान राणाने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. पण मोक्याच्या क्षणी नितेश राणा बाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा कोलकात्याचा डाव कोसळला. पण आंद्रे रसेल याने सर्व सुत्रे आपल्याकडे घेत गोलंदाजांची पिटाई केली. आंद्रे रसेल याने 25 चेंडूत 49 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रसेलने चार षटकार आणि चार चौकार लगावले. 


हैदराबादचा भेदक मारा - 
हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. कोलकात्याच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. ठरावीक अंतराने कोलकात्याच्या विकेट घेतल्या. हैदराबादकडून नटराजन याने सर्वाधिक भेदक मारा केला. नटराजन याने चार षटकार तीन विकेट घेतल्या. तर युवा उमरान मलिक यानेदोन विकेट घेतल्या. त्याशिवाय भुवनेश्वर कुमार, मार्को जानसेन आणि जगदिश सुचित यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 


कोलकात्याच्या संघात तीन बदल, हैदराबादमध्ये सुचितला संधी
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघात बदल करण्यात आले आहे. हैदराबाद संघाने दुखापतग्रस्त वॉशिंगटन सुंदरच्या जागी जगदिश सुचितला संधी दिली. तर कोलकाता संघात तीन बदल करण्यात आले आहे. कोलकाताने अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स आणि राशिक सलाम यांना आराम दिला आहे. यांच्या जागी फिंच, शेल्डॉन जॅक्सन आणि अमन खानला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले.