GT vs LSG : मंगळवारी मुंबईच्या वानखेडे मैदानात झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स सामन्यात गुजरातने राहुल तेवातियाच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर लखनौवर पाच विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान राहुल तेवतिया याने पुन्हा एकदा आयपीएलमधील तो एक दमदार खेळाडू असल्याचं दाखवून दिलं. यंदा त्याला गुजरात संघाने 9 कोटी देऊन विकत घेतलं होतं. त्यानंतर अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते. पण राहुलने पहिल्याच सामन्यातील या खेळीमुळे सर्वांना उत्तर दिलं असून वीरेंद्र सेहवाग यानेही राहुलच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया देताना 'याला 9 कोटीच काय तर 16 कोटी मिळायला हवे.' असं म्हटलं आहे.


गुजरात विरुद्ध लखनौ सामन्यानंतर वीरेंद्र सेहवागने क्रिकबजशी बोलताना राहुलच्या खेळीवर आपलं मत दिलं. तो म्हणाला,''सुरुवातीला जेव्हा राहुलसाठी गुजरातने 9 कोटी मोजले तेव्हा मलाही ही किंमत अधिक वाटली. पण त्याने ज्याप्रकारे धडाकेबाज खेळी केली. त्यानुसार त्याला 9 काय 16 कोटी मिळायला हवे.''


राहुलने पलटला खेळ


सामन्यात आधी फलंदाजी करताना लखनौकडून अष्टपैलू दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर लखनौने 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या. बडोनीने 41 चेंडूत ताबडतोड 54 धावांची खेळी केली. तर दीपकने 41 चेंडूत 55 धावा केल्या. गुजरातकडून शमी सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. शमीने तीन विकेट घेतल्या. तर वरुण वरुण अरोन याने दोन विकेट घेतल्या. तर राशिद खानला एक विकेट मिळाली.  हार्दिक पांड्या आणि लॉकी फर्गुसन यांची विकेटची पाटी कोरीच राहिली. त्यानंतर लखनौने दिलेल्या 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना  गुजरातची सुरुवात खराब झाली होती. सलामी फलंदाज शुभमन गिल शुन्य धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर आलेला विजय शंकरही सहा धावा काढून माघारी परतला. मॅथ्यू वेड आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला पण मोक्याच्या क्षणी दोघेही बाद झाले. हार्दिक पांड्या 33 आणि मॅथ्यू वेडने 30 धावा केल्या. मिलर आणि राहुलने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी भागिदारी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर आवेश खानने मोक्याच्या क्षणी मिलरला बाद केले. मिलरने 30 धावांची खेळी केली. त्यानंतर राहुल तेवातिया आणि युवा अभिनव मनोहर यांनी गुजरतला विजय मिळवून दिला. लखनौकडून दुषंता चमिराने  सर्वाधिक दोन विकेट घेतल्या तर आवेश खान, क्रृणाल पांड्या, दीपक हुड्डा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. यावेळी राहुलच्या 24 चेंडूतील नाबाद 40 धावा सर्वात महत्त्वपूर्ण ठरल्या.


हे देखील वाचा-