IPL 2021, SRH vs KKR : चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या आयपीएल 2021च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा 10 धावांनी पराभव केला. केकेआर विरुद्धच्या रोमांचक लढतीत झालेल्या परभावामुळे हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर मात्र निराश आहे. सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नरने मान्य केलं की, संघातील गोलंदाज फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत, त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 


सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर म्हणाले की, "आम्ही गोलंदाजी करताना आमचा प्लान व्यवस्थित लागू करु शकलो नाही. तर फलंदाजीमध्ये दोन विकेट्स लवकर गमावल्यानंतर मनीष पांडे आणि जॉनी बेयरस्टो यांनी सामन्यात वापसी करुन दिली. ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. माझ्या मते, जर तुम्ही ओव्हर पिच गोलंदाजी कराल, तर निश्चितच समोरच्या संघाला फायदा होणार. हिच गोष्ट कोलकाताच्या गोलंदाजांच्या बाजून पाहायला मिळाली नाही. त्यांनी उत्तम गोलंदाजी केली, त्यामुळे त्यांच्या संघाला चांगली मदत झाली."


दरम्यान, वॉर्नरने मनीष पांडे आणि जॉनी बेयरस्टो यांचं कौतुकही केलं. ते म्हणाले की, "ज्या प्रकारे आम्ही सुरुवातीलाच दोन विकेट्स गमावले होते, त्यानंतर जॉनी आणि मनीष यांनी वापसी करत उत्तम खेळी केली होती. फलंदाजी पाहता स्पर्धेत आम्हाला चांगली लय मिळाली. परंतु, अद्याप खूप सामने बाकी आहेत."



कोलकाताचा हैदराबादवर 10 धावांनी विजय, नितीश राणा, राहुल त्रिपाठी विजयाचे हिरो 


आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात आज कोलकाताने हैदराबादवर 10 धावांनी मात केली. 187 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादला कोलकात्याने 177 धावांवर रोखलं. हैदराबादकडून मनीष पांडेनं संघाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. मनीष पांडेनं 44 चेंडूत 61 धावा केल्या. त्यानं या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याआधी जॉनी बेअरस्टोनं देखील अर्धशतक लगावलं. शेवटी आलेल्या समदनं तडाखेबाज खेळी करत सामन्यात चुरस आणली मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. समदनं अवघ्या 8 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीनं 19 धावा केल्या.  


आव्हानाचा पाठलाग करताना  प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर सलामीवीर वॉर्नर यष्टीमागे झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर शाकिब अल हसनने वृद्धिमान साहाला क्लिनबोल्ड केलं.  त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी हैदराबादचा डाव सावरला. अर्धशतकानंतर बेअरस्टो कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 55 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेला नबी 14 धावांची भर घालून कृष्णाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :