KKR Vs SRH LIVE Score : आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात आज कोलकात्याने हैदराबादवर 10 धावांनी मात केली. 187 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबाला कोलकात्याने 177 धावांवर रोखलं. हैदराबादकडून मनीष पांडेनं संघाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. मनीष पांडेनं 44 चेंडूत 61 धावा केल्या. त्यानं या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याच्याधी जॉनी बेअरस्टोनं देखील अर्धशतक लगावलं. शेवटी आलेल्या समदनं तडाखेबाज खेळी करत सामन्यात चुरस आणली मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. समदनं अवघ्या 8 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीनं 19 धावा केल्या.

  


आव्हानाचा पाठलाग करताना  प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर सलामीवीर वॉर्नर यष्टीमागे झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर शाकिब अल हसनने वृद्धिमान साहाला क्लिनबोल्ड केलं.  त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी हैदराबादचा डाव सावरला. अर्धशतकानंतर बेअरस्टो कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 55 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेला नबी 14 धावांची भर घालून कृष्णाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.


नितीश राणा, राहुल त्रिपाठीची शानदार फलंदाजी
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला 188 धावांचे लक्ष्य दिले. नितीश राणाने 56 चेंडूत 80 धावा केल्या तर राहुल त्रिपाठीने 29 चेंडूत 53 धावा केल्या तर दिनेश कार्तिकने 9 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या. त्याआधी शुभमन गिल आणि नितीश राणा यांनी सलामीला येऊन उत्तम सुरुवात करुन दिली. दोघांनी सात षटकांत पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. गिल 13 चेंडूत 15 धावा करुन बाद झाला. त्याला रशीद खानने बाद केले.यानंतर राणा आणि राहुल त्रिपाठी यांनी दुसर्‍या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. त्रिपाठीने 29 चेंडूत 53 धावा केल्या. त्याने पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले. 


नितीश राणाने 56 चेंडूत 80 धावांचे स्फोटक खेळी केली. यात राणाने 9 चौकार आणि 4 षटकार लगावले. दोन चेंडून दोन गडी बाद करुन नबीने कोलकात्याला मोठा झटका दिला. पण शेवटी, दिनेश कार्तिकने 9 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 187 पर्यंत पोहोचली. कार्तिकने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. आंद्रे रसेल आणि कर्णधार इयान मॉर्गन यांना काही कामगिरी करता आली नाही. मॉर्गन दोन तर रसेल पाच धावांवर बाद झाला.