IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनमध्ये शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात हैदराबादचा मुंबईने 13 धावांनी पराभव केला. हैदराबादच्या संघाने मुंबईच्या विरुद्धच्या सामन्यासाठी संघात चार मोठे बदल केले होते. हैदराबादच्या या संघबदलावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच सर्वात जास्त प्रश्न गेल्या सीझनमध्ये आपल्या गोलंदाजीची जादू दाखवलेल्या टी नटराजनला कालच्या सामन्यात प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवल्यामुळे उपस्थित केले जात आहेत.
परंतु, सनरायझर्स हैदराबादचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी टी नटराजनचा संघात समावेश न केल्याचं कारण सांगितलं आहे. मूडी यांनी सांगितलं की, नटराजनला टीममधून बाहेर ठेवलं नाही, तर त्याला आरामासाठी वेळ देण्यात आला आहे. नटराजन व्यतिरिक्त त्यांनी जेसन होल्डर, रिद्धिमान साहा आणि शाहबाज नदीम यांनाही कालच्या सामन्यात संघाबाहेर ठेवण्यात आलं होतं.
मोठ्या कालावधीनंतर हैदराबादने टी नटराजनला आराम देण्याचा निर्णय घेतला. मूडी यांनी सांगितलं की, "नटराजनला संघाबाहेर नाही बसवलं तर त्याला आराम देण्याक आला आहे. आम्हाला माहिती आहे की, त्याने गेल्या सहा महिन्यात अनेक सामने खेळले आहेत. त्यामुळे आम्हाला त्याची काळजी आहे. कारण आयपीएलचं सीझन खूप काळ सुरु राहणार आहे. जर तो 100 टक्के फिट असेल तर तो नक्की खेळणार."
खलील अहमदला मिळाली होती संधी
टी नटराजन ऐवजी मुंबई विरुद्धच्या सामन्यात खलील अहमदला संघात सहभागी करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त ऑफ स्पिनर मुजीब उर रहमान, लेफ्ट आर्म स्पिनर अभिषेक शर्मा आणि फलंदाज विराट सिंह यांचा संघात समावेश करण्यात आला होता.
दरम्यान, गेल्या सीझनमध्ये टी नटराजनने आपल्या गोलंदाजीच्या जादूने हैदराबादला अनेक कठिण सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. एवढंच नाहीतर टी नटराजनच्या आयपीएलमधील उत्तम कामगिरीमुळे टीम इंडियासाठी तिनही फॉर्मेटमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली होती. परंतु, या सीझनच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये नटराजन फारशी कमाल दाखवू शकला नव्हता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :