IPL 2021 : इंडियन प्रिमीयर लीगच्या 14व्या सीझनमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. परंतु, आता मुंबई इंडियन्सच्या संघाला दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई इंडियन्सचा स्टार ओपनर डी कॉक पुढील सामना खेळू शकतो. याव्यतिरिक्त मुंबई इंडियन्सचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याही लवकरच गोलंदाजी करताना दिसणार आहे. 


आयपीएलच्या 14व्या हंगामात आरसीबी विरोधातील सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला डी कॉक शिवाय मैदानात उतरावं लागलं होतं. डी कॉक 7 एप्रिल रोजी दक्षिण आफ्रिकाहून भारतात आला होता. त्यामुळे आयपीएलच्या नियमांनुसार, डी कॉकला सात दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहावं लागलं होतं. 13 एप्रिलला डॉ कॉकचा क्वॉरंटाईनचा अवधी संपत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या कोलकातासोबतच्या सामन्यात डी कॉक ओपनर बॅट्समन म्हणून मैदानावर उतरु शकतो. 


हार्दिक पांड्या करणार गोलंदाजी 


आरसीबीच्या विरोधातील सामन्यात मुंबईचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नव्हती. सामन्यानंतर समजलं की, हार्दिक पांड्याच्या खांद्यांला दुखापत झाल्यामुळे बंगलोर विरुद्धच्या सामन्यात तो गोलंदाजी करु शकला नव्हता. परंतु, आता मुंबईच्या संघासाठी आनंदाची बातमी आहे की, ऑलराउंडर हार्दिक पांड्या आपल्या दुखापतीतून सावरत असून तो लवकरच संघात गोलंदाजी करताना दिसणार आहे. दरम्यान, हार्दिक पांड्या गेल्या दोन वर्षांपासून गोलंदाजी करत नाहीये. 


हार्दिक पांड्याची दोन वर्षांपूर्वी कंबरेची शस्त्रक्रिया झाली होती. गेल्या सीझनमध्ये हार्दिक पांड्याने फलंदाज म्हणून संघाची धुरा सांभाळली होती. इंग्लंड विरुद्धच्या टी20 सीरिजमध्ये हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली होती. 


दरम्यान, गतविजेत्या मुंबईचा पराभव करत विराट कोहलीच्या बंगळुरूने आयपीएलच्या चौदाव्या सीजनची विजयी सुरुवात केली आहे. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सनं एक परंपरा मात्र कायम ठेवली. ती परंपरा म्हणजे सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची. गेल्या सलग नऊ आयपीएल सिझनमध्ये मुंबईचा सलामीच्या सामन्यात पराभव झाला आहे. 2013 साली RCB विरोधात, 2014 साली KKR, 2015 साली पुन्हा KKR, 2016 साली RPS, 2017 साली पुन्हा RPS, 2018 साली CSK, 2019 साली DC, 2020 साली CSK तर आजच्या सामन्यात पुन्हा एकदा बंगळूरुकडून पराभवाच्या सामना सलामीच्या लढतीत मुंबईला स्वीकारावा लागला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :