IPL 2021, RR vs PBKS : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत  पंजाबने अखेर राजस्थानवर चार धावांनी विजय मिळवला.  पंजाबनं कर्णधार केएल राहुल आणि दीपक हुडाच्या धमाकेदार खेळीच्या बळावर राजस्थानसमोर 222 धावांचं आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने अखेरपर्यंत किल्ला लढवला, पण सॅमसनला हा सामना राजस्थानला  जिंकवून देता आला नाही. 


राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचं अवघ्या 54 चेंडूत दमदार शतक झळकावलं आहे. जे रिचर्डसनच्या गोलंदाजीवर शानदार षटकार आणि चौकार लगावत त्याने शतक साजरं केलं आहे. अखेरच्या चेंडूवर अर्शदीप सिंहने संजू सॅमसनला बाद केल्याने  सामन्यात पंजाबने राजस्थानवर 4 धावांनी विजय मिळवला.


पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी केली.  मयंकला मोठी खेळी करता आली नाही. तो 14 धावांवर चेतन साकरियानं बाद केलं. यानंतर ख्रिस गेल आणि राहुलने चांगली भागिदारी केली. गेलला 40 धावांवर रियान परागनं बाद करुन मोठं यश मिळवून दिलं. गेलने 28 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 40 धावा केल्या. 


गेलनंतर मैदानात आलेल्या दीपक हुड्डाने आक्रमक फटकेबाजी केली. त्यानं अवघ्या 20 चेंडूत आपलं अर्धशतक केलं. राहुलसोबत त्यानं शतकी भागिदारी केली. अवघ्या 45 चेंडूत या दोघांनी शतकी भागीदारी केली. यानंतर दीपक 28 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 64 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेल्या पूरनला शून्यावर बाद केले. चेतन साकरियानं त्याचा भन्नाट झेल पकडला. 


एकीकडे गडी बाद होत असताना दुसरीकडे कर्णधार राहुलनं आपली फटकेबाजी सुरुच ठेवली होती. डावाच्या शेवटच्या षटकात लोकेश राहुल बाद झाला. राहुलने 91 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 5 षटकार लगावले.