दिल्ली कॅपिटल्ससाठी दिलासादायक बातमी आहे. कोविड 19 पॉझिटिव्ह आढळल्यामुळे मुंबईच्या रूग्णालयात सुमारे तीन आठवडे घालवल्यानंतर भारताचा अष्टपैलू आणि दिल्ली कॅपिटलचा खेळाडू अक्षर पटेल आयपीएलमधील त्याच्या संघात सामील झाला आहे. यानंतर दिल्लीच्या तंबूत उत्साह संचारला आहे.


कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह रिपोर्ट
27 वर्षीय अक्षरने यापूर्वी 28 मार्च रोजी मुंबईत दिल्ली संघात प्रवेश केला होता. तो निगेटिव्ह रिपोर्टसह बायो बबलमध्ये आला होता. मात्र, 3 एप्रिलला त्याचा कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. त्याला सौम्य लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्याला भारतीय क्रिकेट बोर्डाच्या मेडिकल फॅकल्टीमध्ये पाठविण्यात आले.


व्हिडीओ शेयर केला
दिल्ली कॅपिटलने पटेल संघात सामील झाल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोबत ट्विट केलंय की, "बापूचा (अक्षर पटेल) दिल्ली कॅपिटल कॅम्पमध्ये परतल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटत आहे." पटेल याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “माणसं पाहून मलाही आनंद होत आहे.”


अक्षरच्या जागेवर या खेळाडूला मिळाली संधी
विशेष म्हणजे, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या देवदत्त पडीकल नंतर अक्षर पटेल हा या प्राणघातक विषाणूची लागण होणारा दुसरा खेळाडू होता. अक्षरच्या अनुपस्थितीत दिल्लीने मुंबईच्या शम्स मुलानीला आपल्या संघात सहभागी करुन घेतले होते.