2008  IPL Final : आयपीएलच्या 15व्या मोसमाची मेगा फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. यंदाच्या मोसमात नव्यानं दाखल झालेला गुजरात टायटन्स आणि 14 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेली राजस्थान रॉयल्स यांच्यात फायनलचा हा थरार पाहायला मिळणार आहे. या लेखात आपण आयपीएलच्या पहिल्या फायनल सामन्यात काय झाले, ते जाणून घेणार आहोत..


एक जून 2008.... आयपीएलचा पहिला विजेता मिळाला होता.. हा खिताब राजस्थान रॉयल्सने जिंकला होता. राजस्थान रॉयल्ससमोर पहिला टी 20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या धोनीचं आव्हान होतं... चेन्नई आणि राजस्थान यांच्यात आयपीएलची पहिली फायनल झाली होती.. राजस्थानचं नेतृत्व शेन वॉर्न यांच्याकडे होते.. राजस्थान संघाला पहिल्या हंगामात अंडरडॉग म्हटले जात होतं.. त्यावेळी राजस्थानकडे यूसुफ पठान, शेन वॉटसन, पाकिस्तानचा विकेटकीपर कामरान अकमल आणि रवींद्र जडेजा असे विस्फोटक फलंदाज होते. जाडेजा तेव्हा 19 वर्षांचा होता.. आताप्रमाणे तो फलंदाजीत मॅच्युर नव्हता.. अशात सर्वाधिक आशा वॉटसन, यूसुफ आणि कामरान यांच्याकडूनच होत्या... गोलंदाजत शेन वॉर्न होते...


यूसुफचा गोलंदाजीत जलवा -
मोक्याच्या सामन्यात शेन वॉर्नने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईकडून पार्थिव पटेल आणि विद्युत शिवरामाकृष्णन यांनी सलामीची भूमिका पार पाडली.. दोघांनी 39 धावांची सलामी दिली होती... यूसुफ पठाणने राजस्थानला पहिले यश मिळवून दिले होते.. त्यानंतर चेन्नईच्या 64 धावा झाल्यानंतर यूसुफ पठाणनेच पार्थिव पटेलचा अडथळा दूर केला होता.. यूसुफ पठाणने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत चेन्नईच्या फलंदाजांनी बांधून ठेवले होते. चेन्नईच्या 95 धावा झाल्यानंतर यूसुफ पठाणने आणखी एक विकेट घेत चेन्नईला तिसरा धक्का दिला..  एल्बी मॉर्कलचा अडथळा यूसुफ पठाणने दूर केला... एका बाजूला विकेट पडत असताना मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणारा रैना धावांचा पाऊस पाडत होता.. सुरेश रैनाने चेन्नईचा डाव सावरला.. रैनाने  30 चेंडूत 43 धावांची खेळी केली. चेन्नईने निर्धारित 20 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 163 धावा केल्या... या डावाच यूसुफ पठाणने चार षटकात 22 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या होत्या.  


यूसुफची फलंदाजीत कमाल - 
164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. राजस्थानने 43 धावांवर आघाडीचे तीन फलंदाज गमावले होते.. ओपनर नीरज पटेल आणि स्वप्निल असनोदकर यांच्यासोबत कामरानही बाद झाला होता... त्यानंतर शेन वॉटसन आणि यूसुफ पठाण यांनी राजस्थानचा डाव सावरला.. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 46 चेंडूत 65 धावांची खेळी केली. या सामन्यात यूसुफ पठाणने 39 चेंडूत 56 धावांची खेळी केली. तर वॉटसनने 19 चेंडूत 28 धावांची खेळी केली.  


अखेरच्या षटकात काय झाले?
राजस्थानला अखेरच्या षटकात विजयासाठी आठ धावांची गरज होती. त्यावेळी मैदानावर कर्णधार शेन वॉर्न आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तनवीर होता. तर चेन्नईकडून एल बालाजी अखेरचं षटक टाकत होता. या षटकात एकही चौकार-षटकार गेला नाही.. एकेरी-दुहेरी धावा काढत राजस्थानने सामना जिंकला.. अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज होती.. सोहेल तनवीरने काढली...या सामन्यात यूसुफ पठाणला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.