IND vs SA: आयपीएल 2022 नंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. तसेच आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी देण्यात आली आहे. परंतु, आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 400 हून अधिक धावा केलेल्या शिखर धवनला भारतीय टी-20 संघात स्थान मिळालं नाही. तर, संजू सॅमसनलाही संघातून वगळण्यात आलं आहे. 


शिखर धवन आणि संजू सॅमसनची कामगिरी
आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपच्या यादीत शिखर धवन सहाव्या क्रमांकावर आहे. त्यानं या हंगामात 13 सामने खेळले आहेत. ज्यात 38. 27 च्या सरासरीनं 432 धावा केल्या आहेत. यादरम्यान, अनेक सामन्यात शिखर धवननं पंजाबच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. मात्र, तरीही त्याला संघातून वगळण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त संजू सॅमसननंही या हंगामात 374 धावा केल्या आहेत. या हंगामात त्यानं 147. 24 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. परंतु, तरीही त्याला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेतून वगळण्यात आलं आहे. 


'या' युवा खेळाडूंवर होती सर्वांची नजर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू तिळक वर्माला संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. पण त्यालाही संधी मिळाली नाही. तिळक यांनी या आयपीएलमध्ये 397 धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांच्या धावाही 400 च्या जवळ पोहोचल्या आहेत. पण त्यांचंही नाव टीम इंडियाच्या संघात नाही. मोहसीन खान आणि खलील अहमद यांचा गोलंदाजांमध्ये समावेश होण्याची शक्यता होती. मात्र, या दोन्ही गोलंदाजांचे हातही रिकामेच राहिले. खलीलनं या आयपीएलमध्ये 10 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. तर मोहसीनचा इकॉनॉमी रेट 6 पेक्षा कमी आहे.


भारतीय टी-20 संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक. 


हे देखील वाचा-