IPL Players Payment System : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली. गतविजेत्या गुजरातने चेन्नईचा पराभव करत यंदाच्या हंगामाची विजयी सुरुवात केली. आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. तर आयपीएल सुरुवात झाल्यानंतरही काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले. पहिल्याच सामन्यात केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाला, त्यानंतर तो संपूर्ण आयपीएलमधून बाहेर गेलाय. तर ऋषभ पंत, श्रेयस अय्यर याच्यासह अनेक खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलला मुकणार आहेत. दुखापतीमुळे आयपीएलमध्ये न खेळणाऱ्या खेळाडूंना फ्रेंचायझीकडून पैसे दिले जातात का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. सोशल मीडियावर गाव-खेड्यातील कट्ट्यावर आणि चहाच्या टपरीवर याचीच चर्चा सुरु आहे. 


एखादा खेळाडू संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असेल तर त्याला पूर्ण पैसे दिले जातात, भलेही त्या खेळाडूने एकही सामना खेळला नसेल. पण लिवात विकत घेतलेली संपूर्ण रक्कम त्या खेळाडूला दिली जाते, यात कोणतीही साशंकता नाही. पण खेळाडूला कोणत्या पद्धतीने पैसा द्यायचा हे सर्व फ्रेंचायझी ठरवते. काही फ्रेंचायझी आयपीएलचा हंगाम सुरु होण्याआधीच खेळाडूला संपूर्ण रक्कम देते. तर काही फ्रेंचायझी आयपीएलच्या सुरुवातीला अर्धी रक्कम देतात अन् उर्वरित रक्कम आयपीएल संपल्यानंतर दिली जाते. दुखापतग्रस्त खेळाडूंना पैसे देण्यासाठी फ्रेंचायझी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करतात. 


 ऋषभ पंतला फ्रेंचायझी पैसे देणार नाही, एक सामना खेळणाऱ्या विल्यमसनचे काय होणार?


आयपीएलचा हंगाम सुरु होण्याआधीच जर एखादा खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर जात असेल त्याला कोणतीही रक्कम दिली जात नाही. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याला फ्रेंचायझीकडून रक्कम मिळणार नाही, कारण तो आयपीएल सुरु होण्याआधीच दुखापतग्रस्त झाला होता. तर दुसरीकडे केन विल्यमसन पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. विल्यमसनच्या मेडिकलचा सर्व खर्च संघ उचलेल, त्याशिवाय त्याला संपूर्ण रक्कमही दिली जाईल. कारण विल्यमसनला कॅम्पमध्ये दुखापत झाली होती. एखाद्या खेळाडूला आयपीएल सुरु असताना दुखापत झाली तर त्याला संपूर्ण रक्कम दिली जाते. जर एखादा खेळाडू मर्यादित सामने खेळण्यासाठी उपलब्ध असेल तर त्याला सामन्याच्या हिशोबाने पैसे दिले जातात. आरसीबीचा जोश हेजलवूड सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नाही, त्याला सामन्याच्या हिशोबाने पैसे दिले जातील. 


आणखी वाचा :


IPL 2023 : 'मुंह फोडबा का', आयपीएलमध्ये भोजपुरी कॉमेंट्रीचा भौकाल, रवी किशनच्या स्वॅगवर नेटकरी फिदा! 


विराट कोहलीच्या हातावर टॅटू काढण्यासाठी लागले 14 तास, आर्टिस्टने सांगितला अर्थ