IPL Expensive Players Performances : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली. आतापर्यंत प्रत्येक संघाचा एक एक सामना झाला आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये अनेक दिग्गज खेळाडू खेळत आहे. लिलावात काही खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली.. पण पहिल्या सामन्यात त्यांची कामगिरी लौकिकास साजेशी झाली नाही. यामध्ये मुंबई, चेन्नई आणि पंजाबच्या खेळाडूंचा समावेश आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये महागड्या खेळाडूंना अपयश आलेय. पाहूयात पहिल्या पाच सामन्यात महागड्या खेळाडूंची कशी कामगिरी राहिली.. 


सॅम करन - 


अष्टपैलू सॅम करन यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू आहे. पंजाबने सॅम करन 18.25 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. पण पहिल्या सामन्यात त्याला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. सॅम करन याला फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करता आली नाही. कोलकाता विरोधात झालेल्या सामन्यात सॅम करन याने 17 चेंडूत दोन षटकारासह 26 धावा केल्या. तर गोलंदाजीत चार षटकात 38 धावा खर्च करत एक विकेट घेतली. 
 
कॅमरून ग्रीन


मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमरुन ग्रीन पहिल्याच सामन्यात फ्लॉप ठरला.. कॅमरुन ग्रीनवर मुंबईने कोट्यवधी रुपये खर्च केले होते. पण पहिल्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत तो अपयशी ठरला. फलंदाजीत त्याला फक्त पाच धावा करता आल्या. तर गोलंदाजीत त्याने दोन षटकात 30 धावा खर्च केल्या. कॅमरुन ग्रीनशिवाय ईशान किशन यालाही आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. किशनला मुंबईने कोट्यवधी रुपये खर्च करुन आपल्या ताफ्यात घेतले. पण तो फ्लॉप ठरलाय.


बेन स्टोक्स 


धोनीनंतर चेन्नईची धुरा बेन स्टोक्सकडे सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. पण इंग्लंडचा हा अष्टपैलू खेळाडू पहिल्याच सामन्यात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करु शकला नाही. स्टोक्सला पहिल्या सामन्यात फक्त सात धावा करता आल्या. तर दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करता आली नाही.


हॅरी ब्रूक


इंग्लंडच्या युवा हॅरी ब्रूक याला हैदराबादने कोट्यवधी रुपये खर्च करत आपल्या ताफ्यात घेतले. पण हॅरी ब्रूक याला पहिल्या सामन्यात अपयश आले. राजस्थानच्या गोलंदाजीपुढे हॅरी ब्रूक याने गुडघे टेकले होते. त्याने 21 चेंडूत फक्त 13 धावा केल्या 


केएल राहुल


केएल राहुल याला लखनौने 16 कोटी रुपयात आपल्या संघात घेतले. कर्णधारपदाची धुराही राहुलच्या खांद्यावर आहे. गेल्यावर्षी राहुलने धावांचा पाऊस पाडला होता. पण यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात तो फेल गेलाय.  दिल्लीविरोधात राहुलला फक्त 8 धावा काढता आल्या.