ICC Men's T20 Wolrd Cup 2024 : भारतामध्ये सध्या आयपीएलचा महासंग्राम सुरु आहे. आयपीएल आता ऐन रंगात आलं आहे, पण देशभरातील क्रीडा चाहत्यांमध्ये विश्वचषकासंदर्भात चर्चा सुरु आहे. आयपीएलनंतर 2 जूनपासून टी20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. पण विश्वचषकासाठी टीम इंडियाचे 15 शिलेदार कोणते असतील? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. आजी-माजी क्रिकेटरकडून आपल्या संभाव्य संघाची (India T20 World Cup Squad) घोषणा केली जात आहे. सहा वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या अंबातू रायडू यानेही टी 20 विश्वचषकासाठी 15 जणांच्या चमूची निवड केली आहे. रायडूनं निवडलेला संघ सध्या चर्चेत आहे, कारण त्यानं दिग्गजांना डच्चू दिलाय, त्याशिवाय युवा खेळाडूंना स्थान दिलेय.  पाहूयात रायडूनं निवडलेल्या संघात कोण कोण आहे?


2 जून पासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी 20 विश्वचषकाचा महासंग्राम होणार आहे. विश्वचषकात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघात कोण कोण असेल? कोणत्या गोलंदाजांना स्थान मिळणार? अष्टपैलू कोण असतील? विकेटकीपर कोण असेल? याबाबतच्या चर्चा सुरु आहेत. टीम इंडियाचा माजी फलंदाज अंबाती रायडू यानं आपल्या 15 जणांच्या चमूमध्ये हार्दिक पांड्या, संजू सॅमसन आणि ऋषभ पंत याना बाहेरचा रस्ता दाखवलाय. त्याशिवाय अश्विन आणि शुभमन गिल, ईशान किशन यांनाही डावलले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात कोणते खेळाडू असतील, याबाबत रायडूनं स्पष्ट सांगितलेय. स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना रायडूनं आपला 15 जणांचा संघ निवडलाय. 


फलंदाज कोण कोण ? 


रोहित शर्मा, यशस्वी जायस्वाल, सूर्यकुमार यादव आणि रियान पराग यांच्यावर टॉप ऑर्डरची जबाबदारी असेल. रोहित शर्म आणि यशस्वी डावाची सुरुवात करतील. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. तर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.


अष्टपैलू कोण कोण ?


अंबाती रायडूनं अष्टपैलू खेळाडू निवडताना खास लक्ष ठेवलेय. रायडूनं फॉर्मात नसलेल्या हार्दिक पांड्याला संघात स्थान दिले नाही. शिवम दुबे, रविंद्र जाडेजा या दोन अष्टपैलू खेळाडूंना रायडूनं संघात स्थान दिलेय. 


फिनिशर कोण ? 


रिंकू सिंह आणि दिनेश कार्तिक यांना फिनिशर म्हणून रायडूनं आपल्या संघात स्थान दिलेय. 


गोलंदाजीत कोण कोण ?


अंबाती रायडूनं आपल्या ताफ्यात चार वेगवान गोलंदाजांना स्थान दिलेय. तर दोन फिरकी स्पेशालिस्ट गोलंदाज ताफ्यत ठेवले आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांच्या जोडीला अर्शदीप सिंह याला निवडलेय. त्याशिवाय आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकणाऱ्या मयंक यादव यालाही स्थान दिलेय. फिरकीची धुरा युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीवर ठेवली आहे. त्यांच्या जोडीला रवींद्र जाडेजा असेल.


अंबाती रायूडनं निवडेल्या संघात कोण कोण ?


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रियान पराग, रिंकू सिंह, दिनेश कार्तिक, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, मयांक यादव




दरम्यान, यंदाचा विश्वचषकात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील मैदानात पार पडणार आहे. दोन जून पासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. सध्या जगभरातील बरेच खेळाडू आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवत आहे. पुढील काही दिवसांमध्ये टीम इंडियाचे 15 शिलेदार निवडले जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 किंवा 30 एप्रिल रोजी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड करणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ टी 20 विश्वचषकात उतरणार आहे.