GT vs RR, IPL 2022 : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. क्वालिफायर 1 च्या सामन्यापूर्वी कोलकात्यामध्ये दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार होता. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत आर्धी बाजी मारली आहे. पण सामन्यात काय होणार? हे पुढील काही तासांत समजणार आहे.
संजू सॅमसनने आज पुन्हा एकदा नाणेफेक गमावली आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिकवेळा नाणेफेक गमावण्याचा नकोसा विक्रम संजूच्या नावावर जमा झालाय. राजस्थान आणि गुजरात यांच्यामध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सामना रंगणार आहे. मोक्याच्या सामन्यात गुजरात टायटन्सने मोठा बदल केला आहे. गुजरातने अनुभवी लॉकी फर्गुसनला आराम दिला आहे. त्याच्याजागी अल्झारी जोसेफला संधी दिली आहे. लॉकी फर्गुसन मागील हंगामात कोलकात्याकडून खेळला होता.. त्यामुळे ईडन गार्डन मैदानाचा त्याला चांगला अनुभव आहे. पण महत्वाच्या सामन्यात हार्दिक पांड्याने लॉकीला बाहेर बसवले... हार्दिकचा हा निर्णय कितपत यशस्वी ठरतोय... हे सामन्यातच समजणार आहे. राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही....
राजस्थानची (Rajasthan Royals) प्लेईंग 11 -
जोस बटलर, यशस्वी जायस्वाल, संजू सॅमसन (विकेटकिपर, कर्णदार), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, ओबेड मेकॉय, यजुवेंद्र चाहल, प्रसिद्ध कृष्णा
गुजरातची (Gujarat Titans) प्लेईंग 11 -
शुभमन गिल, वृद्धीमान साहा(विकेटकिपर), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, आर. साईकिशोर, मोहम्मद शामी, अल्झारी जोसेफ, यश दयाल
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने पदार्पणाच्या आयपीएल हंगामात दमदार कामगिरी केली. सांघिक खेळाच्या बळावर गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. साखळी फेरीत गुजरातच्या संघाने 10 विजय मिळवले तर फक्त चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थानने 18 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान काबिज केलेय. जोस बटलरने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. तर चाहलने सर्वाधिक विकेट घेतल्या आहे. साखळी फेरीत पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप राजस्थानच्या खेळाडूकडे आहे... त्यावरुन राजस्थान संघाची कामगिरी कशी झाली असेल याचा अंदाज लावू शकता.. राजस्थान संघाने 14 सामन्यात 9 विजय आणि पाच सामन्यात पराभव स्वीकाराला आहे. गुजरात आणि राजस्थान यांच्यात क्वालिफायर 1 चा सामना होत आहे. जिंकणारा संघ फायनलमध्ये जाणार आहे.