Delhi Capitals vs Chennai Super Kings Qualifier 1: दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी 9 व्या वेळी अंतिम फेरी गाठली आहे. कर्णधार एमएस धोनीने चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने अवघ्या सहा चेंडूत नाबाद 18 धावा केल्या. त्यात तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. याशिवाय रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड यांनी अर्धशतके झळकावली. उथप्पाने 44 चेंडूत 63 धावा आणि गायकवाडने 50 चेंडूत 70 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 172 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपर किंग्सने शेवटच्या षटकात सहा गडी गमावून विजय मिळवला.


शेवटची ओव्हर..
चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने चेंडू टॉम कुरनला दिला, ज्याने दोन बळी घेतले. टॉमने पहिल्या चेंडूवर मोईनला झेलबाद केले. आता पाच चेंडूत 13 धावा करायच्या होत्या. मात्र, चेन्नईसाठी चांगली गोष्ट म्हणजे एमएस धोनी क्रीजवर आला होता. दुसऱ्या चेंडूवर धोनीने शानदार चौकार मारला. आता चेन्नईला विजयासाठी चार चेंडूंमध्ये 9 धावा करायच्या होत्या. धोनीने पुढच्या चेंडूवर पुन्हा चौकार मारला आणि आता त्याच्या संघाला विजयासाठी तीन चेंडूत पाच धावा कराव्या लागल्या. टॉमने नंतर एक वाइड फेकला. आणि मग पुढच्या चेंडूवर धोनीने चौकार लगावला. अशा प्रकारे चेन्नईने दोन चेंडू शिल्लक असताना लक्ष्याचा पाठलाग केला.



तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला शिखर धवन सात चेंडूत अवघ्या सात धावा करून बाद झाला. जोश हेजलवूडने त्याला धोनीच्या हाती झेलबाद केले. मात्र, यानंतर पृथ्वी शॉ चेन्नईच्या गोलंदाजांवर तुटून पडला.


शॉने अवघ्या 34 चेंडूत 60 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान, त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि तीन षटकार मारले. मात्र, दुसऱ्या टोकाला त्याला कोणतेही सहकार्य मिळत नव्हते. दरम्यान, श्रेयस अय्यर 01 आणि अक्षर पटेल 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.


शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी 11 व्या षटकात 80 धावांवर चार गडी बाद झाल्यानंतर 83 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. हेटमायरने 24 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. दुसरीकडे, कर्णधार पंत 35 चेंडूत 51 धावांवर नाबाद राहिला. त्याने तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. तसेच टॉम कुरान शून्यावर नाबाद परतला.