Kane Williamson Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad IPL 2022: ब्रेबॉन स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात दिल्लीने हैदराबादचा 21 धावांनी पराभव केला. दिल्लीने दिलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ आठ गड्यांच्या मोबदल्यात 186 धावांपर्यंत मजल मारु शकला. निकोलस पूरन याने एकाकी झुंज देत 62 धावांची विस्फोटक खेळी केली. पूरनला एकाही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. परिणामी दिल्लीने सामना जिंकत दोन गुण खिशात टाकले. या पराभवानंतर हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने पराभवाची समिक्षा केली. सामन्यानंतर बोलताना कर्णधार विल्यमसन याने नेमका पराभव का झाला? चूक कुठे झाली.. याबाबत सांगितले. तसेच पुढील सामन्यातील रणनिती काय असेल.. याबाबतही सांगितले. 
 
सामन्यानंतर विल्यमसन म्हणाला की, ‘‘ दिल्लीने दमदार फलंदाजी केली. मैदान लहान होतं. तसेच दव ही होतं. जर आम्ही विकेट न फेकता फलंदाजी केली असती. अखेरच्या षटकांमध्ये आमच्याकडे विकेट असत्या तर निर्णय वेगळा लागला असता. आम्ही प्रतिस्पर्धी संघाला दबाव निर्माण करण्याची संधी दिली. संघावर दबाव वाढला होता. आता पुढील सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आणखी चांगली कामगिरी करु.. मोठ्या भागिदारी कऱण्याचा प्रयत्न करवा लागेल.’’


टॉम मुडी काय म्हणाले?
" जर आम्ही खराब खेळलो असतो तर चिंतेचं कारण होतं. पण आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आहे. जर काही गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या तर आम्ही लक्षाचा यशस्वी पाठलाग केला असता. आम्ही लक्षाच्या किती जवळ पोहचलो, हे सर्वांनी पाहिलेय. निकोलस पूरनने 34 चेंडूत 62 धावांची खेळी केली."  आम्ही लवकरच पुनरागमन करु. पराभवाला विसरुन विजयाच्या पटरीवर येऊ, असा विश्वास आहे. आम्ही आणखी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहेत, असेही मुडी म्हणाले. टॉम मुडी यांना हैदराबादचा संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवेल, अशी आशा आहे. 


दरम्यान,  हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. दिल्लीच्या संघानं 20 षटकात 3 विकेट्स गमावून हैदराबादसमोर 208 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. दिल्लीकडून सलामीवीर डेव्हिड वार्नर आणि रोव्हमन पॉवेल यांनी तुफानी खेळी केली. दिल्लीनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादचा संघ 20 षटकात 8 विकेट्स गमावून 186 धावा करून शकला. या विजयासह दिल्लीच्या संघानं यंदाच्या हंगामातील पाचवा विजय नोंदवला असून गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.