DC vs RCB: ग्लेन मॅक्सवेलचं तुफानी अर्धशतक आणि दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 189 धावांपर्यंत मजल मारली आहे. खराब सुरुवातीनंतर मॅक्सवेल, दिनेश कार्तिक आणि शाबाज अहमद यांच्या फटकेबाजीच्या बाळावर आरसीबीने दिल्लीला विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिले आहे. दिल्लीकडून शार्दुल ठाकूर याने किफायतशीर गोलंदाजी केली.
आरसीबीची खराब सुरुवात -
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज अनुज रावत शून्य धावसंख्येवर बाद झाला. शार्दुल ठाकूरच्या अप्रितम चेंडूवर अनुज रावत पायचीत झाला. त्यानंतर आरसीबीच्या आजी-माजी कर्णधारांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण फाफ डु प्लेसिस अवघ्या 8 धावांवर बाद झाला. डु प्लेसिसनंतर विराट कोहलीही 12 धावा काढून तंबूत परतला. पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या सुयेश प्रभुदेसाईला दिल्लीविरोधात मोठी खेळी करण्यात अपयश आले. सुयेश अवघ्या सहा धावांवर बाद झाला.
मॅक्सेवलची अर्धशतकी खेळी -
एका बाजूला विकेट पडत असताना मॅक्सवेल याने दुसरी बाजू लावून धरली. मॅक्सवेल याने दमदार अर्धशतकी करत संघाची धावसंख्या वाढवली. मॅक्सवेलने 34 चेंडूत 55 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान मॅक्सेवलने दोन षटकार आणि सात चौकार लगावले. मॅक्सवेलनं आरसीबीच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला.
कार्तिकचं वादळ, शाबाजचा फिनिशिंग टच -
मॅक्सवेल बाद झाल्यानंतर आरसीबीच्या अडचणीत वाढ झाली होती. आरसीबी 150 धावांपर्यंत पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण कार्तिक आणि शाबाज यांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी करत डावाला आकार दिला. दोघांनी मैदानावर स्थिरावल्यानंतर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. कार्तिकने मोक्याच्या क्षणी 34 चेंडूत 66 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान कार्तिकने पाच षटकार आणि पाच चौकार लगावले. कार्तिकने मुस्तफिजूरच्या एका षटकात 28 धावा वसूल करत आरसीबीची धावसंख्या वाढवली. तर शाबाजनेही कार्तिकला उत्तम साथ दिली. शाबाजने 21 चेंडूत 32 धावांची खेळी केली. शाबाज आणि कार्तिक यांनी 52 चेंडूत 97 धावांची नाबाद भागिदारी केली. दोघांच्या फटकेबाजीच्या बळावर आरसीबीने 189 धावांपर्यंत मजल मारली.
दिल्लीची गोलंदाजी -
दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला. दिल्लीच्या गोलंदाजांपुढे आरसीबीच्या दिग्गज फलंदाजांनीही गुडघे टेकले. आघाडीचे सर्वच फलंदाज तंबूत परतले होते. मात्र, कार्तिक आणि मॅक्सवेलपुढे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत भासत होती. दिल्लीकडून शार्दुल ठाकूर, खलील अहमद, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. शार्दुल ठाकूर यांनी सर्वात कमी धावा दिल्या. शार्दुल ठाकूरने चार षटकात 27 धावा देत एक विकेट घेतली.