CSK vs LSG : आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) त्याच्या आयपीएल (Indian Premier League 2024) कारकिर्दीतील दुसरं शतक झळकावलं आहे. गायकवाडने लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धच्या सामन्यात 56 चेंडूत शतक झळकावलं यावेळी त्याने 11 चौकार आणि 3 षटकार ठोकले. ऋतुराज गायकवाडचे हे शतक 18व्या षटकातही खास ठरलं. त्याने यश ठाकूरच्या चेंडूवर चौकार मारून शतक पूर्ण केले. यापूर्वी आयपीएल 2024 मध्ये ऋतुराज गायकवाडची सर्वाधिक धावसंख्या 67 होती. केकेआरविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 67 धावा करत चेन्नईच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.


ऋतुराज गायकवाडची ऐतिहासिक कामगिरी


आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने लखनौ विरुद्धच्या सामन्यात धमाकेदार शतकी खेळी केली. यासोबतच त्याने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. चेन्नई संघाचा कर्णधाराने पहिल्यांदाच आयपीएलच्या इतिहासात शतकी खेळी केली आहे. ऋतुराज गायकवाड चेन्नई संघाचा कर्णधार म्हणून यंदा पहिलाच हंगाम खेळत आहे. त्यातच त्याने चेन्नईचा कर्णधार म्हणून शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. 






ऋतुराजची चेन्नईच्या चाहत्यांसाठी अनोखी भेट


लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी चेन्नईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्या षटकात अजिंक्य रहाणे बाद झाला. त्यानंतर 50 धावांवर दुसरी विकेट पडली. एका टोकाकडून सातत्याने विकेट पडत होत्या, तर दुसऱ्या बाजूला ऋतुराज गायकवाड पाय खंबीर रोवू उभा होता. या डावात शिवम दुबेनेही त्याला पूर्ण साथ दिली, त्याच्यासोबत ऋतुराज आणि शिवमने 104 धावांची भागीदारी केली. चेन्नईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियमवर ऋतुराजने शतक झळकावून चेन्नईच्या (CSK) चाहत्यांसाठी अनोखी भेट दिली आहे. 






आयपीएल 2024 मध्ये शतक ठोकणारा सातवा फलंदाज


ऋतुराज गायकवाड यंदाच्या आयपीएलच्या हंगामात (IPL 2024) शतक ठोकणारा सातवा फलंदाज ठरला आहे. ऋतुराज यंदा दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल 2024 मध्ये याआधी विराट कोहली, रोहित शर्मा, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, ट्रॅव्हिस हेड आणि सुनील नरेन यांनीही शतके झळकावली आहेत. ऋतुराज गायकवाडने आता आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये खेळल्या गेलेल्या आठ सामन्यांमध्ये तीन अर्धशतक आणि एक शतक झळकावलं आहे. त्याने चालू मोसमात 58.16 च्या सरासरीने 349 धावा केल्या आहेत. ऋतुरात ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.