IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. चेन्नईच्या संघाचा हुकमाचा एक्का म्हणजेच रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) संघाबाहेर पडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र जाडेजाला दुखापतीमुळं आयपीएल 2022 मधून बाहेर पडावं लागू शकते. चेन्नईच्या संघात यापूर्वीच अनेक बदल करण्यात आले आहेत. दीपक चहरही दुखापतीमुळं स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ज्यामुळं चेन्नईच्या संघाला यंदाच्या हंगामात मोठं नुकसान सहन करावं लागलंय.
बंगळुरूविरुद्ध सामन्यात रवींद्र जाडेजाला दुखापत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रवींद्र जडेजाला दुखापत झाली. एवढेच नव्हेतर दुखापतीमुळं त्याला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. यादरम्यान, रवींद्र जडेजाला आयपीएल 2022 मधून बाहेर पडावं लागू शकते, अशी बातम्यांनी वेग धरला आहे.
चेन्नईचा पुढचा सामना मुंबई इंडियन्सशी
चेन्नईच्या संघानं काही दिवसांपूर्वी रवींद्र जाडेजाच्या दुखापतीची माहिती दिली होती. सध्या आयपीएलची स्पर्धी शेवटच्या टप्प्यात आली आहे आणि रवींद्र जाडेजाच्या दुखापतीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. चेन्नईचा पुढचा सामना मुंबई इंडियन्सशी खेळणार आहे. त्यामुळं संघ व्यवस्थापन त्यांना आणखी धोका पत्करणार नाही. चेन्नईचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला नाही. परंतु, बंगळुरू किंवा राजस्थान रॉयल्सनं दोन सामने जिंकल्यास चेन्नईचे बाहेर पडणे जवळपास निश्चित होईल.
रवींद्र जाडेजाचं खराब प्रदर्शन
आयपीएल सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं रवींद्र जाडेजाकडं चेन्नईच्या संघाचं कर्णधारपद सोपवलं होतं. परंतु, रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. रवींद्र जाडेजानं आठ सामन्यात चेन्नईच्या संघाचं नेतृत्व केलंय. यापैकी सहा सामन्यात चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर रवींद्र जाडेजानं पु्न्हा कर्णधाराची जबाबदारी धोनीकडं सोपवली.
हे देखील वाचा-