पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात काल सामना झाला. यामध्ये पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थानने पंजाबचा तीन गडी राखून पराभव केला. राजस्थानचा शिमरॉन हेटमायरने शानदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबला आता आणखी एक झटका बसला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) दुखापतीमुळे संघाबाहेर होता. आता मिळालेल्या माहितीनूसार शिखर धवनला आणखी काही सामन्यातून माघार घ्यावी लागू शकते, असं समोर येत आहे. धवनच्या अनुपस्थितीत सॅम कुरनने राजस्थानविरुद्ध पंजाब किंग्जची कमान सांभाळली. धवनच्या दुखापतीबाबत पंजाब किंग्जचे क्रिकेट डेव्हलपमेंटचे प्रमुख संजय बांगर म्हणाले, खांद्याला दुखापत झाल्यामुळे आम्हाला त्याची उणीव जाणवली. त्यामुळे पुढील काही सामन्यांसाठी तो बाहेर राहू शकतो असे मी म्हणेन. आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि धवन उपचारांना कसा प्रतिसाद देतो हे पाहावे लागेल. परंतु आत्ता असे दिसते आहे की तो पुढील 7 ते 10 दिवसांसाठी बाहेर असू शकतो, अशी माहिती बांगर यांनी दिली.
पंजाबचे पुढील दोन सामने घरच्या मैदानावर-
पुढील 10 दिवसांत पंजाब आपले पुढील दोन्ही सामने घरच्या मैदानावर खेळणार आहे. पहिला सामना गुरूवार, 18 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. यानंतर घरच्या मैदानावर पंजाबचा पुढील सामना रविवारी, 21 एप्रिल रोजी गुजरात टायटन्सशी होणार आहे.
पंजाबची वाईट अवस्था-
पंजाबने या हंगामात 6 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त 2 जिंकता आले आहेत. संघाने आयपीएल 2024 ची सुरुवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा 4 गडी राखून पराभव केला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्याविरुद्धचे पुढील दोन सामने संघ हरला. पुढच्या सामन्यात संघाने गुजरात टायटन्सचा 3 गडी राखून पराभव केला. यानंतर हैदराबाद आणि राजस्थानविरुद्धच्या पुढील दोन सामन्यांत पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला.
गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स अव्वल-
राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानावर आहे. यानंतर कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोलकाताचा नेट रनरेट +1.528 आहे, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईचा +0.666 आणि चौथ्या क्रमांकावरील लखनौचा +0.436 आहे. इतर संघांवर नजर टाकल्यास सनराजर्स हैदराबाद पाचव्या क्रमांकावर आणि गुजरात टायटन्स सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे 6-6 गुण आहेत. हैदराबादने 5 पैकी 3 विजय नोंदवले आहेत, तर गुजरातने 6 पैकी 3 विजय मिळवले आहेत. त्यानंतर मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स 4-4 गुणांसह अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. निव्वळ धावगतीमुळे तिन्ही संघांच्या स्थानांमध्ये तफावत आहे. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एका विजयासह गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या:
टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान
7 वर्षे डेट, लग्नाआधीच 1 मुलगा; किरॉन पोलार्डची पत्नी आहे मोठ्या ब्रँडची मालकीण, पाहा Photo's
उर्वशी रौतेला ऋषत पंतला नव्हे, तर फुटबॉलपटूला करतेय डेट?; फोटोवरील 'कॅप्शन'ने लक्ष वेधलं!