IPL 2022 : आगामी आयपीएलला काही महिने (IPL 2022) शिल्लक असतानाच स्पर्धेची लगबग सुरु झाली आहे. लिलाव प्रक्रियेआधी रिटेंशन प्रक्रिया (IPL 2022 Retention) नुकतीच पार पडली. यावेळी नव्याने सामिल झालेल्या दोन संघाशिवाय जुन्या आठ संघानी एकूण 27 खेळाडूंना रिटेन केलं. ज्यामध्ये अनेक धक्कादायक निर्णय समोर आले. अनेक संघानी त्यांच्या खास आणि महत्त्वाच्या खेळाडूंना फॉर्म, बजेट अशा विविध कारणांमुळे सोडलं. त्यात 4 खेळाडूंनाच रिटेन करण्याची मुभा असल्याने संघासमोर मोठा प्रश्न होता. ज्यामुळे मुंबईने हार्दिक, चैन्नईने रैना, दिल्लीने श्रेयस अय्यर अशा महत्त्वाच्या खेळाडूंना मागे सोडलं. पण आता या सर्वांना मेगा लिलावामध्ये पुन्हा संघात घेण्याची संधी संघाकडे आहे. त्यामुळे आता लिलावासाठी (Mega Auction IPL) कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे, जाणून घेऊया...


बीसीसआयने (BCCI) यंदा प्रत्येक संघाला लिलावात खेळाडू खरेदी करण्यासाठी 90 कोटी रुपये दिले आहेत. रिटेशनमध्ये खेळाडू खरेदी केल्यास यामधून रक्कम वजा होणार होती. यावेळी पहिल्या रिटेशनसाठी 16 कोटी, दुसऱ्या रिटेशनसाठी 12 कोटी, तिसऱ्या रिटेशनसाठी 8 आणि चौथ्या रिटेशनसाठी 6 कोटी रुपयांची मर्यादा होती. दरम्यान या रिटेंशननंतर सर्वांत कमी रक्कम दिल्ली संघाकडे शिल्लक राहिली आहे. तर पंजाबकडे सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे.


दिल्लीने खर्च केले सर्वाधिक रुपये


दिल्ली कॅपिटल्स संघाने (DC) कर्णधार ऋषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.50 कोटी) आणि ए. नॉर्खिया (6.50 कोटी) या चौघांना रिटेन केलं. ज्यासाठी त्यांना 42.50 कोटी रुपये खर्च करावे लागले. आता लिलावासाठी त्यांच्याकडे 47.50 कोटी रुपयेच शिल्लक आहेत.


मुंबईला हार्दीकला घेता येऊ शकतं


सर्वाधिक आयपीएल विजय मिळवलेला आयपीएल संघ मुंबईने रिटेंशनमध्ये  रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सुर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी) यांना रिटेन केलं आहे. ज्यानंतर त्यांच्याकडे 48 कोटी रुपये शिल्लक आहेत. या पैशात ते
हार्दीक, बोल्टसारख्या खेळाडूंना घेऊ इच्छित असणार आहेत. दरम्यान महत्त्वाचे आणि महागडे खेळाडू खरेदी केल्याने आता ते हार्दीकला घेऊ शकतात. पण त्यापूर्वी नवे संघ अहमदाबाद आणि लखनौ यांनी हार्दीकला घेतलं तर मुंबईचा हुकूमी एक्का निसटू शकतो.


चेन्नईकडेही 48 कोटी शिल्लक


मुंबई इंडियन्सप्रमाणे चेन्नई सुपर किंग्स संघाकडेही 48 कोटी शिल्लक आहेत. त्यांनी महेंद्र सिंह धोनी (12 कोटी), रविंद्र जाडेजा (16 कोटी),  मोईन अली (8 कोटी) आणि ऋतुराज गायकवाड (6 कोटी) यांना रिटेन केलं आहे. आता लिलावात ते 48 कोटीमध्ये फाफ डुप्लेसीस, सुरेश रैना या महत्त्वाच्या खेळाडूंना घेण्याची आशा नक्कीच बाळगतील.


केकेआरनेही रिटेन केले महत्त्वाचे 4 खेळाडू


कोलकाता नाइट रायडर्स संघाने देखील त्यांच्या महत्त्वाच्या 4 खेळाडूंना 42 कोटी रुपये खर्च करुन रिटेन केलं आहे. यामध्ये आंद्रे रस्सेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी) आणि सुनील नारायण (6 कोटी) यांना त्यांनी रिटेन केलं आहे.आता लिलावात ते 48 कोटी घेऊन उतरतील. यावेळी सर्वात आधी म्हणजे एक उत्तम कर्णधाराची जागा सांभाळण्यासाठी खेळाडू शोधण्याचा प्रयत्न संघ करेल.


राजस्थानचा खिसाही गरम


राजस्थान रॉयल्सने केवळ 3 खेळाडूंना चांगल्या रकमेत रिटेन केल्याने त्यांच्याकडे तब्बल 62 कोटी शिल्लक आहेत. त्यांनी संजू सॅमसन (14 कोटी), जॉस बटलर (10 कोटी), यशस्वी जयस्वाल (4 कोटी) यांना रिटेन केलं आहे.


आरसीबीचा कर्णधार कोण?


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी) आणि मोहम्मद सिराज ( 7 कोटी) यांना रिटेन केलं आहे. त्यांच्याकडे आता 57 कोटी शिल्लक असून संघाचं कर्णधारपद विराटने सोडल्यामुळे संघाचा कर्णधार कोण असणार? हे पाहावे लागेल.


वॉर्नरला सोडल्यानंतर हैद्राबादकडे बक्कळ रक्कम शिल्लक


सनरायजर्स हैदराबाद संघाने (SRH) केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल सामद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी) यांना रिटेन केलं आहे. त्यांनी माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरला न घेतल्यामुळे त्यांच्या खिशात 68 कोटी इतकी मोठी रक्कम अजूनही शिल्लक आहे.


पंजाकडे सर्वाधिक रक्कम शिल्लक


संपूर्ण रिटेंशन प्रक्रियेनंतर सर्वाधिक पैसे पंजाब किंग्स संघाकडे शिल्लक आहेत. पंजाबने मयांक अग्रवाल (12 कोटी) आणि अर्शदीप सिंह (4 कोटी) यांनाच रिटेन केलं असल्याने त्यांच्याकडे तब्बल 72 कोटी शिल्लक आहेत. जे घेऊन लिलाव प्रक्रियेत ते एक उत्तम कर्णधार सर्वात आधी शोधणार आहेत.


संबधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha