5 Reasons KKR Won IPL Final Against SRH : कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या सतराव्या मोसमाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. आयपीएलच्या इतिहासात कोलकात्याचं हे तिसरं विजेतेपद ठरलं. कोलकात्यानं याआधी 2012 आणि 2014 साली आयपीएल जिंकण्याची कामगिरी बजावली होती. त्यानंतर यंदा पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलची किंग ठरली आहे. कोलकात्यानं चेन्नईतल्या आयपीएल फायनलनवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी हैदराबादचा अख्खा डाव 113 धावांत गुंडाळून आपल्या संघाला विजयाची नामी संधी मिळवून दिली. कोलकात्याच्या फलंदाजांनी विजयासाठीचं लक्ष्य अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात आणि तब्बल 57 चेंडू राखून पार केलं. कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरनं नाबाद 52 धावांची, तर रहमानउल्लाह गुरबाजनं 39 धावांची खेळी उभारली. त्याआधी कोलकात्याकडून आंद्रे रसेलनं 19 धावात तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कोलकात्याच्या विजयाची पाच प्रमुख कारणं कोणती जाणून घेऊयात...


मिचेल स्टार्कचा भेदक मारा - 


हैदराबादविरोधात मिचेल स्टार्क यानं भेदक मारा केला. पहिल्याच षटकात धोकादायक अभिषेक शर्माला घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर राहुल त्रिपाठी यालाही तंबूत धाडले. मिचेल स्टार्क यानं पॉवरप्लेमध्ये भेदक मारा करत कोलकात्याच्या विजायाची स्क्रिप्ट लिहिली. क्वालिफायर 1 सामन्यातही स्टार्कने हैदराबादविरोधात भेदक मारा केला होता. 


श्रेयस अय्यरचं नेतृत्व - 


श्रेयश अय्यर यानं शानदार नेतृत्व केले. अंतिम सामन्यात कोणताही दबाव घेतला नाही,खेळाडूंवरही दडपण येऊ दिले नाही. श्रेयस अय्यर याने गोलंदाजांचा शिताफीने वापर केला. त्याने फिल्डिंगही शानदार सेट केली होती. त्याचा प्रत्येक डाव यशस्वी ठरला. श्रेयस अय्यरचं नेतृत्व अनुभवी पॅट कमिन्सपेक्षा दर्जेदार ठरले. नाणेफेकीवेळी त्याने खेळपट्टी पाहून गोलंदाजी घेतली असती, असे सांगितले. कोलकात्याच्या विजयात श्रेयस अय्यरचा सिंहाचा वाटा राहिलाय. 


वेंकटेश अय्यरचं शानदार अर्धशतक - 


माफक 114 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवातही खराब झाली होती. फॉर्मात असलेला सुनिल नारायण स्वस्तात बाद झाला होता. पण वेंकटेश अय्यरने कोणताही दबाव न घेता फटकेबाजी केली. वेंकटेश अय्यरने हैदराबादच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. त्याने 26 चेंडूमध्ये नाबाद 52 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने तीन षटकार आणि चार चौकार ठोकले. 


पॅट कमिन्सची चूक अन् कोलकात्याचा भेदक मारा - 


पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कमिन्सचा हा निर्णय कोलकात्याच्या पथ्यावर पडला. कोलकात्याच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत ठरावीक अंतराने विकेट घेतल्या. कोलकात्याच्या गोलंदाजांनी एकाही फलंदाजाला स्थिरावू दिले नाही. हर्षिक राणा, स्टार्क, वरुण चक्रवर्ती, नारायण,रसेल आणि वैभव अरोरा यांनी भेदक मारा करत हैदराबादला खिंडार पाडले. हैदराबादची भक्कम फलंदाजी फक्त 113 धावांत गारद झाली. 


गौतम गंभीर अन् चंदू पंडितचं डोकं - 


मैदानावर श्रेयस अय्यरच्या संघाने शानदार खेळी करत चषकावर नाव कोरले. पण या विजयामध्ये मेंटॉर गौतम गंभीर आणि कोच चंदू पंडित यांचाही सिंहाचा वाटा आहे. या जोडगोळीने अचूक प्लॅन आखात हैदराबादचा बाजार उठवला. मैदानाबाहेरुन या दोघांनी युक्त्या लढवत, खेळाडूंना मार्गदर्शन केले. हैदराबादच्या प्रत्येक खेळाडूविरोधात या दोघांनी प्लॅन आखला होता, त्या प्लॅनवर श्रेयस अय्यरच्या संघाने काम केले.