KKR vs SRH IPL Final 2024: कोलकात्याच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादचा डाव फक्त 113 धावांवर संपुष्टात आला. कोलकात्याच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादचे फलंदाज थयथय नाचले. हैदराबादच्या एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या गाठता आली नाही. हैदराबादकडून सर्वाधिक धावा पॅट कमिन्सने केल्या. कर्णधार कमिन्स याने 24 धावांचे योगदान दिले. अभिषेक शर्मा, हेड, माक्ररम, क्लासेन सर्व फलंदाज फेल ठरले. कोलकात्याकडून आंद्रे रसेल याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. स्टार्क अन् वैभव अरोरा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तिसऱ्यांदा चषकावर जिंकण्यासाठी कोलकात्याला फक्त 114 धावांची गरज आहे.  


चौकार अन् षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हैदराबादच्या फलंदाजांनी आज निराशा केली. हैदराबादच्या फलंदाजांनी आज फक्त तीन षटकार ठोकले. तर त्यांना फक्त आठ चौकार ठोकता आले.


हेड-अभिषेक फ्लॉप -


चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कोलकात्याच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादची दाणादाण उडाली. मिचेल स्टार्क आणि वैभव अरोरा याच्या माऱ्यापुढे पॉवरप्लेमध्येच हैदराबादचे तीन फलंदाज तंबूत परतले. त्यामध्ये अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड आणि राहुल त्रिपाठी स्वस्तात तंबूत परतले. ट्रेविस हे याला तर खातेही उघडता आले नाही. अभिषेक शर्मा फक्त दोन धावा काढून बाद झाला. मिचेल स्टार्कने अप्रतिम चेंडूवर त्रिफाळा उडवला. राहुल त्रिपाठीलाही मोठी खेळी करता आली नाही. राहुल त्रिपाठी फक्त नऊ धावा काढून बाद झाला, त्याला फक्त एक चौकार ठोकता आला. पॉवरप्लेमध्ये हैदराबादने फक्त 40 धावा काढल्या, पण त्यांनी तीन विकेटही गमावल्या. 


मध्यक्रमही ढेपाळला, ये रे माझ्या मागल्या स्थिती - 



आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर एडन माक्ररम आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संघर्ष केला. त्यांना चांगली सुरुवातही मिळाली, पण मोठी खेळी करता आली नाही.  एडन माक्ररम याचा अडथळा रसेलने दूर केला. माक्ररम याला फक्त 20 धावाच करता आल्या. त्याने या खेळीमध्ये तीन चौकार ठोकले. नीतीश कुमार रेड्डी याने 13 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. विकेटकीपर फलंदाज हेनरिक क्लासेन हैदराबादचा डाव सावरेल असे वाटले होते, पण हर्षिक राणा याने त्याला तंबूत पाठवले. हेनरिक क्लासेन याला फक्त 16 धावा काढता आल्या, त्यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. 


लोअर ऑर्डरही धाराशाही -


अवघ्या 71 धावांत हैदराबादचे सहा आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. त्यामध्ये हेड, शर्मा, मार्करम, राहुल त्रिपाठी, रेड्डी अन् क्लासेन या फलंदाजांचा समावेश होता. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर शाहबाज अहमद आणि अब्दुल समद यांच्यावर मोठी जबाबदारी होती, पम त्यांना यश आले नाही. शाहबाज अहमद याने फक्त चार धावा केल्या, त्याला वरुण चक्रवर्तीने तंबूत धाडले.  शाहबाज अहमदने 17 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 8 धावा केल्या.  अब्दुल समद याला इम्पॅक्ट पाडता आला नाही, तो फक्त चार धावा काढून बाद झाला. आंद्रे रसेल याने अब्दुल समद याला बाद करत कोलकात्याला मोठं यश मिळवून दिले. 


पॅट कमिन्सची एकाकी झुंज - 


हैदराबादच्या फलंदाजांनी कोलकात्याच्या माऱ्यापुढे लोटांगण घातले. अंतिम सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पडले, असा अंदाज होता. पमण हैदराबादच्या फलंदाजांनी निराशा केली. पण अखेरीस पॅट कमिन्स याने शानदार फलंदाजी करत धावसंख्या 100 च्या पार पोहचवली. जयदेव उनादकट याने 11 चेंडूमध्ये चार धावांचं योगदान दिले. पॅट कमिन्स याने 19 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने एक षटकार अन् दोन चौकार ठोकलेत. 


कोलकातात्याचा भेदक मारा - 


चेपॉक स्टेडियमवर कोलकात्याच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. कोलकात्याच्या गोलंदाजीसमोर हैदराबादची भक्कम फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. हैदराबादने ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. आंद्रे रसेल सर्वात य़सस्वी गोलंदाज ठरला. रसेल याने 2.3 षटकात 19 धावा खर्च करत तीन विकेट घेतल्या. हर्षित राणा येन चार षटकात फक्त 24 धावा खर्च करत दोन फलंदाजांना तंबूत धाडले. हर्षित राणा यानं एक षटक निर्धाव टाकले. सुनील नारायण याने चार षटकात फक्त 16 धावा खर्च करत एक विकेट घेतली. मिचेल स्टार्क याने 3 षटकात 14 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.