Indian Premier league : इंडियन प्रिमिअर लीगच्या (Indian Premier League) 17 व्या हंगामासाठी बीसीसीआयने (BCCI) जोरदार तयारी सुरु केलीये. आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी काही आठवड्यांपूर्वीच लिलाव पार पडला होता. त्यामुळे आयपीएल केव्हा सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. आयपीएल कधी सुरु होणार हे बीसीसीआयने (BCCI) सांगितले नसले तरीही मार्चमध्ये स्पर्धेला सुरुवात होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. दरम्यान, यावर्षीच्या महिला आयपीएलच्या स्पर्धाही मार्चमध्येच होणार आहेत.
22 मार्चपासून सुरु होणार आयपीएलचा 17 वा हंगाम
आयपीएलचा 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला आयपीएलला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होईल. या वर्षी भारतात सार्वत्रिक निवडणुक देखील आहे. आयपीएल आणि निवडणुकांमध्ये अंतर ठेवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्यामुळे निवडणुका पार पडल्यानंतर आयपीएलला सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. 2019 मध्ये लोकसभेची निवडणुक झाली तेव्हा आयपीएलचे सामने भारतामध्येच झाले होते.
विदेशातही पार पडले आहेत आयपीएलचे सामने
आयपीएलच्या दुसऱ्या आणि सहाव्या हंगामातील सामने विदेशातही खेळवण्यात आले होते. आयपीएल 2009 चे सर्व सामने दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आले होते. तर 2014 च्या हंगामातील सुरुवातीचे काही सामने युएईमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित सामने भारतात खेळवण्यात आले होते.
दोन शहरांमध्ये होणार महिला आयपीएलचे (WIPL) सामने
बीसीसीआयने 2023 पासून महिला आयपीएल स्पर्धेच्या आयोजनास सुरुवात केली आहे. या वर्षीचा हंगाम मार्च महिन्यापासून सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामात सर्व सामने एकाच शहरात खेळवण्यात आले होते. मुंबईतील वेगवेगळ्या स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात आले होते. बीसीसीआयने महिला आयपीएलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केलाय.
कोणत्या शहरांमध्ये होणार सामने? (Women's IPL)
यंदाच्या महिला आयपीएलचे (Women's IPL) सामने दोन शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली आणि बंगळुरु या दोन शहरांमध्ये महिला आयपीएलचे सामने खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने बाजी मारली होती. दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स हे महिला आयपीएलमधील इतर संघ आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या