MLA Disqualification Case Verdict : पक्ष, चिन्ह आमच्याकडे आहे त्यामुळे निकालही आमच्या बाजूनं लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. थोड्याच वेळात शिवसेना  आमदार अपात्रेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( rahul narvekar ) थोड्याच वेळात देणार आहेत. त्याआधी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्याकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना निकाल आपल्याच बाजूने लागेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर हल्लाबोलही केला. त्याशिवाय राहुल नार्वेकर यांच्याशी झालेल्या भेटीवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. नार्वेकर भरदिवसा भेटायला आले होते, रात्री भेटले नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 


बहुमत आमच्याकडे - 


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अधिकृत निर्णय आल्यानंतर प्रतिक्रिया देईल आमची भूमिका स्पष्ट करेल. शिवसेना पक्ष म्हणून निवडणूक आयोगानं आम्हाला अधिकृत मान्यता दिली. धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं आम्हाला दिलं. बहुमताच्या जोरावर निवडणूक आयोगानं आम्हाला पक्ष आणि चिन्ह दिले आहे.  विधानसभेमध्ये 67 टक्के बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये 75 टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. सिम्बॉलही आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं काही लोक आता मॅच फिक्सिंगचा आरोप करतात. पण त्यांचे आमदार, विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या केबिनमध्ये जेवत होते, त्यावर आम्ही आक्षेप घेतला नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.   


अध्यक्षांच्या भेटीवर स्पष्टीकरण, ठाकरेंवर हल्लाबोल - 


त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले ते अधिकृत त्यांच्या वाहनातून आले. अध्यक्ष अधिकृतपणे आले, रात्री लपून आले नाहीत. दिवसाच्या उजेडामध्ये आले.  त्यांच्या मतदारसंघांमध्ये जे काम सुरू आहे कोस्टल रोड, मरीन ड्राईव्ह मी स्वतः पाहणी केली होती. ते आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जे काही काम मतदार संघातील इतरही काही विषय होते आणि अधिकार्‍यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली. लपून-छपून बैठक झालेली नाही. त्यामुळे जे लोक स्वतःच्या मनात चांदणं लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये त्या करत नाही. आमचं काम अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही सत्य नाही, जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ही संस्था चांगली असते. जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकार होतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 


मेरिटवर अध्यक्षांनी निकाल द्यायला हवा - 


मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे. कारण पक्ष आम्ही आहोत, धनुष्यबाण आमच्याकडे आहे .  घटनाबाह्य घटनाबाह्य सरकार म्हणतात सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे 40 प्लस दहा पन्नास आणि भारतीय जनता पक्षाचे 106 असे 164 आमदारांचं बहुमत आमच्याकडे होतं. मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मतदान झाले तेव्हा 164 सरकारच्या बाजूने आणि विरोधात 99 मतं पडली. म्हणजे बहुमताचं सरकार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.