KKR vs CSK, Match Preview: चेन्नईचं नंबर वन गाठण्याचं लक्ष्य तर कोलकाता प्ले ऑफचा रस्ता सुकर करणार?
IPL 2021, Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings:आयपीएल 2021 मध्ये आज सुपर संडेच्या दिवशी पहिला सामना चेन्नई आणि कोलकातामध्ये होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता हा सामना खेळला जाईल.
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders: आयपीएल 2021 मध्ये आज सुपर संडेच्या दिवशी पहिला सामना चेन्नई आणि कोलकातामध्ये होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता हा सामना खेळला जाईल. अबुधाबीमध्ये होत असलेल्या या सामन्याचं प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर पाहू शकाल. दिल्लीनं कालचा सामना जिंकल्यानं चेन्नई दुसऱ्या स्थानावर आली आहे. हा सामना जिंकत पुन्हा चेन्नई नंबर वनवर पोहोचण्याचा प्रयत्न करेल तर कर्णधार मोर्गनच्या नेतृत्वात कोलकाता हा सामना जिंकत प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग सोपा करतील.
चेन्नईच्या फलंदाजांची मदार असलेले ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, अंबाटी रायुडू, महेंद्रसिंह धोनी यांच्यावर आहे. तर कोलकाताची भिस्त धडाकेबाज फलंदाज वेंकटेश अय्यरवर असेल. त्याने बंगळूरुविरुद्ध 41 आणि मुंबईविरुद्ध 53 धावांची खेळी साकारून लक्ष वेधले आहे. शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांच्या खेळीकडे देखील लक्ष असेल.
केकेआरकडे मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती सह आंद्रे रसेल, सुनील नरेन, लॉकी फर्ग्यूसन आणि प्रसिद्ध कृष्णा अशी तगडी गोलंदाजांची फौज आहे. तर चेन्नईकडेही ड्वेन ब्रावोसह शार्दुल ठाकुर, दीपक चहर आणि जोश हेजलवुड या नियमित गोलंदाजांसह रविंद्र जाडेजा आणि मोईन अली असे अष्टपैलू खेळाडूही आहेत.
चेन्नईचं पारडं जड
सीएसके आणि केकेआर दरम्यान आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 26 सामने खेळले गेले आहेत. यात चेन्नईनं 16 सामने जिंकले आहेत तर केकेआरनं 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला. आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात झालेल्या सामन्यातही चेन्नईनं कोलकात्याला हरवलं होतं. त्या सामन्यात चेन्नईनं 20 ओव्हरमध्ये 220 धावा केल्या होत्या. तर केकेआरनं 202 धावा केल्या होत्या. चेन्नईकडून फाफ डू प्लेसिसने नाबाद 95 तर ऋतुराज गायकवाडने 64 धावांची खेळी केली होती.
केकेआरची संभावित प्लेइंग इलेव्हन- वेंकटेश अय्यर, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयोन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नरेन, लॉकी फर्ग्यूसन, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.
चेन्नईची संभावित प्लेइंग इलेव्हन- फाफ डू प्लेसी, ऋतुराज गायकवाड़, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार), रविन्द्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर आणि जोश हेजलवुड.