IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना कमालीचा चुरशीचा झाला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या या३५ व्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरवर लागला. या सामन्याचा हीरो ठरला कोलकात्याचा लॉकी फर्ग्युसन. पण त्याचबरोबर मैदानातल्या आणखी एका व्यक्तीनं चांगलाच भाव खाल्ला. आणि ते होते ऑन फील्ड पंच पश्चिम पाठक
पश्चिम पाठक सहकारी पंच एस रवी यांच्यासह मैदानात उतरले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. याचं कारण त्यांची अनोखी हेअरस्टाईल. लांबसडक केस असलेले हे रॉकस्टार पंचमहाशय आहेत तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला. पण ते गेली अनेक वर्ष पंच म्हणून काम पाहणारे पश्चिम पाठक आहेत हे कळल्यावर अनेकांनी तोंडात बोटं घातली. कारण याआधी पश्चिम पाठक अशा अवतारात कधीच दिसले नव्हते.
मैदानात उभं राहण्याचीही अनोखी स्टाईल
पूर्वीच्या काळी कंबरेत वाकून नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेनं पंचगिरी करणारे पंच तुम्ही पाहिले असतील. आताच्या काळात असं चित्र क्वचितच दिसतं. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच मैदानात ताठ उभे राहून आपली भूमिका बजावताना दिसतात. पण याला फाटा देत पश्चिम पाठक वाकून, गुडघ्यावर हात ठेऊन पंचगिरी करताना दिसले. त्यामुळे पायचीतचा निर्णय देताना चेंडूची उंची आणि इम्पॅक्ट आणि लाईन यांचा अचूक अंदाज येतो असं पाठक यांचं म्हणणं आहे.
पाठक यांची कारकीर्द
मुंबईकर असलेले पश्चिम पाठक 2009 पासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम पाहत आहेत. त्याचबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही त्यांनी फोर्थ अंपायर म्हणून भूमिका बजावली आहे. 2012 साली महिलांच्या वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यात पाठक मुख्य पंच होते.
आयपीएलमध्ये याआधीही पाठक पंच
पश्चिम पाठक यांचा आयपीएलचा हा तिसरा सीझन आहे. याआधी 2014 आणि 2015 साली पाठक यांनी आयपीएलमध्ये पंच म्हणून काम पाहिलं होतं. त्या दोन्ही सीझनमध्ये ते आठ सामने मुख्य पंचांच्या भूमिकेत होते.
पश्चिम पाठक याआधीही चर्चेत
2015 साली हेल्मेट घालून पंचगिरी करणारे पश्चिम पाठक चर्चेचा विषय ठरले होते. विजय हजारे करंडकात मुख्य पंचाची भूमिका बजावताना पाठक यांनी हेल्मेटचा वापर केला होता. याचं कारण तामिळनाडूतल्या एका रणजी सामन्यात पाठक यांचे सहकारी असलेले ऑस्ट्रेलियन पंच जॉन वॉर्ड यांच्या डोक्याला चेंडू लागून गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी पाठक हे त्या सामन्यात स्क्वेअर लेगला उभे होते.
डोळ्यासमोरची ही घटना पाहिल्यानंतर पाठक यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या स्थानिक स्पर्धांमध्येही हेल्मेट वापरायला सुरुवात केली होती. पण काही काळानंतर हेल्मेट वापरल्यानं मैदानावर चुका होण्याची शक्यता जास्त असल्यानं पाठक यांनी ते वापरणं बंद केलं होतं.