मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन बीगेन अंतर्गत आता विविध विभागांना लोकलने मुंबईत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. यामध्ये डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यासह अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या जवळपास सर्वच विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हीच बाब समोर ठेवत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या खाजगी सुरक्षारक्षकांनी देखील आम्हाला लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.


यामध्ये नमूद करण्यात आलं आहे की, आम्ही मागील 7 महिन्यांपासून अनेक ठिकाणी दिवसरात्र सुरक्षा देण्याचं काम करत आहोत. यामध्ये मोठमोठ्या कंपन्या, रुग्णालये, महत्त्वाची ऑफिसेस, गाड्यांचे शोरूम यांचा समावेश आहे. टाळेबंदीच्या काळात ज्यावेळी मोठमोठया कंपन्या आणि ऑफिसेस बंद होती त्यावेळी आमच्या सुरक्षा रक्षकांनी याठिकाणी अहोरात्र सेवा केली आहे. त्याकाळात वाहतूक सेवा उपलब्ध नसताना देखील या कर्मचाऱ्यांनी आर्थिक जादा भुर्दंड सहन करत आपली सेवा निष्ठेने बजावली आहे. त्यामुळे आमची राज्य सरकारला विनंती आहे की, ज्या पद्दतीने राज्यसरकारने महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बोर्डाला लोकलने प्रवास करण्याची मुंबईत परवानगी दिली आहे. त्याच पद्दतीने आम्हाला देखील मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी.


मुंबईकरांच्या लाईफलाईन रुळांवर, आज मोनो धावली, उद्या मेट्रो धावणार, सर्वसामान्यांना लोकलसाठी मात्र वेट अॅंड वॉच


कारण आमच्या सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य असणाऱ्या खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेतील कर्मचारी हे मुंबई उपनगरातुन येत असतात. यातील बहुतेक सर्व कर्मचाऱ्यांना पगार 12 ते 13 हजार रुपये आहे. त्यांना महिन्याला मुंबई उपनगरातुन कामासाठी मुंबईत येण्यासाठी 3 हजार 500 ते 4 हजार रुपये इतका खर्च येत आहे. हा खर्च या सर्व कर्मचार्ऱ्यांना परवडणारा नाही त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने या सर्व कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी.


याबाबत बोलताना सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष गुरूचरणसिंह चौहान म्हणाले की, आम्ही नुकतीच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांना आमच्या विविध मागण्यांबाबतचे पत्र दिलं आहे. यामध्ये प्रामुख्याने आमच्या खाजगी सुरक्षा रक्षकांना तत्काळ मुंबईत लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी ही मागणी केली आहे. सध्या मुंबईच्या उपनगरातुन मुंबईत विविध ठिकाणी आमचे कर्मचारी कामासाठी येत असतात. सध्या या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करता येत नसल्यामुळे त्यांना कमीतकमी 3 ते 4 तासांचा प्रवास करून मुंबईत यावं लागत आहे. तसेच त्यांना 2 ते 3 वेळा बस बदलावी लागत आहे. शिवाय तिकिटापोटी बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे या सर्व गरीब कर्मचाऱ्यांचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी.


Unlock 5.0 | मुंबईत मोनो-मेट्रो रुळावर, लोकलची मात्र प्रतिक्षा